धुळे : अतिक्रमित जागेची नोंद कमी करून अद्ययावत दाखला मिळण्याच्या बदल्यात चार हजार रुपयांची लाच मागितल्या व स्विकारल्या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यासह एकूण चौघेजण धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब नामदेव पाटील (ग्रामविकास अधिकारी, फागणे, नगराज हिलाल पाटील – खाजगी इसम सरपंच पती, किरण शाम पाटील – शिपाई ग्रामपंचायत फागणे आणि पितांबर शिवराम पाटील – रोजगार सेवक अशी या लाचखोरीच्या प्रकरणातील चौघांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार यांनी फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करुन घर बांधले होते. या अतिक्रमणात बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली आहे. त्याप्रमाणे या घराच्या नमुना आठच्या उताऱ्यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करुन तक्रारदारास त्यांच्या घराच्या नमुना नंबर आठ अद्यावत उतारा हवा होता.
त्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात तक्रार दिली होती. 16 जुलै 2024 रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणी अंती सरपंच पती नगराज पाटील आणि रोजगार सेवक पितांबर पाटील या दोघांनी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना 4000 रुपये देण्यासाठी तक्रारदारास प्रोत्साहित केले.
दिनांक 18 जुलै रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदारास चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम शिपाई किरण पाटील याने स्वीकारली. त्यामुळे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सापळा अधिकारी रुपाली खांडवी तसेच सापळा पथकातील पो.हवा.राजन कदम, पो.ना. संतोष पावरा, पो. कॉ. बारेला, पो. कॉ. प्रशांत बागुल आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.