जळगाव : वाळू वाहतूक व्यवसाय बिनबोभाट सुरु ठेवण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता स्विकारणा-या हवालदाराविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पोलिस स्टेशनला कार्यरत त्याच पोलिस स्टेशनला लाच घेतल्याप्रकरणी स्वत:विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची वेळ या लाचखोर हवालदारावर आली आहे. किरण रविंद्र पाटील असे या हवालदाराचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. या व्यावसायिकाविरुद्ध अगोदरच दोन गुन्हे दाखल आहेत. वाळू वाहतुकीचा व्यवसाय विना कारवाई बिनदिक्कतपणे सुरु राहण्यासाठी हवालदार किरण पाटील यांनी त्याच्याकडे 2 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. वाळू व्यावसायीकाने याबाबत जळगाव एसीबी कार्यालयाकडे रितसर तक्रार दाखल केली.
एसीबीच्या पडताळणीत पहिला हप्ता पन्नास हजार रुपये देण्या-घेण्याचे निश्चित झाले. लाचेची रक्कम स्विकारताच हवालदार किरण पाटील यास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाचखोर किरण पाटील याचा उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधिक्षकांच्या हस्ते गुन्हे आढावा बैठकीत 25 जुलै रोजी सत्कार झाला होता. लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.