ज्याने दिला मदतीचा हात त्यालाच दाखवली काळरात्र – नितीनचे मारेकरी वैभव – संतोष मैत्रीला नव्हतेच पात्र

जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): नितीन साहेबराव पाटील आणि वैभव गोकुळ कोळी हे दोघे एकाच परिसरात राहणारे मित्र होते. जळगाव शहरातील जुना आसोदा रोडवरील रेल्वे गेट नजीक असलेल्या कला-वसंत नगर परिसरात दोघे रहात होते. गेल्या पाच वर्षापासून नितीन आणि वैभव हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. अडी अडचणीत दोघे एकमेकांच्या मदतीला धावून जात होते. आयटीआय उत्तीर्ण झालेल्या नितीन यास गेल्या वर्षी रेल्वेमधे नोकरीसाठी आवश्यक असलेली अ‍ॅप्रेंटीसशिपची संधी मिळाली. त्या अ‍ॅप्रेंटीसशिपसाठी त्याला दिल्ली येथे जावे लागले. दिल्ली येथे तो मित्रांसोबत राहू लागला. अधूनमधून सुट्यांमधे तो जळगाव येथे आई – वडील आणि भावाच्या भेटीला येत होता. जळगावला आला म्हणजे तो त्याचा मित्र वैभव कोळी याची देखील भेट घेत असे.

काही महिन्यांपुर्वी वैभवचे लग्न ठरले. स्वत:च्या लग्नासाठी वैभव यास पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने हक्काचा मित्र म्हणून नितीनकडे उधार स्वरुपात चार ते पाच लाख रुपयांची मागणी केली. नितीनकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. त्यामुळे काही रक्कम नितीनने तर काही रक्कम त्याचे वडील साहेबराव पाटील अशा दोघांनी मिळून वैभवला उधार दिली. लवकरात लवकर काही महिन्यात रक्कम परत देण्याच्या बोलीवर वैभवने ती रक्कम नितीनकडून घेतली. अडी अडचणीत मित्रच मित्राची मदत करतो असे समजून वैभववर विश्वास ठेवत नितीनने त्याला मदत  केली.

संतोष भागवत कठोरे हा बोदवड येथील तरुण वैभवचा मित्र होता. नितीन आणी त्याच्या वडीलांकडून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम वैभवने संतोषला दिली होती. लाखो रुपये हाती पडल्यानंतर वैभव आणि संतोष या दोघांची नियत फिरली. मैत्री या दोन अक्षरी शब्दावर विश्वास ठेवत नितीनने वैभवला लाखो रुपयांची मदत केली. मात्र वैभवने मैत्री या शब्दाचा अनादर करण्याचे मनातल्या मनात ठरवले होते.

दिवसामागून दिवस जाऊ लागले. ठरल्यानुसार उधार घेतलेली रक्कम वैभवने नितीनला वेळेवर परत केली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव नितीनने ती रक्कम वैभवला मागण्याचे काम सुरु केले. मात्र आज देतो, उद्या देतो असे करत करत बरेच दिवस निघून गेले. तरी देखील वैभवने उधार घेतलेली रक्कम नितीनला परत केली नाही. अखेर नाईलाजास्तव नितीनने वैभवकडे त्याची रक्कम मागण्याचा तगादा सुरु केला. या तगाद्याला वैभव वैतागला. त्याने हा प्रकार त्याचा बोदवड येथील मित्र संतोष कठोरे याला कथन  केला. नितीनकडून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम वैभवने संतोषला दिली होती.

मित्र नितीनने आपल्याला वेळेवर केलेली आर्थिक मदत वैभव विसरला होता. त्याने संतोषच्या मदतीने नितीनचा कायमचा काटा काढण्याचे निश्चित केले. नितीनला कायमचे संपवले म्हणजे ती रक्कम आपल्याला पचवता येईल, नितीनचा तगादा कायमचा संपेल आणि ती परत देण्याचे काम देखील संपेल असा कुविचार दोघांच्या मनात आला. त्या दृष्टीने वैभव आणि संतोष हे दोघेजण कामाला लागले. त्यांनी नितीनचा खून करण्याचा कट रचला.

18 जुलै रोजी दुपारी तिन वाजेच्या सुमारास नितीन दिल्ली येथून जळगावला आई वडीलांकडे आला. दुपारचे जेवण त्याने घरी केले ते शेवटचे. याचे कारण म्हणजे नियतीने या दिवशी वैभव आणि संतोष या दोघांच्या माध्यमातून त्याचा मृत्यु लिहून ठेवला होता. ठरलेल्या कटानुसार वैभवने संतोषला म्हटले की आपण दोघे मुक्ताईनगरला जाऊ. त्याठिकाणी माझा मित्र रक्कम देणार आहे. ती रक्कम तुला देतो. त्यानंतर आपण दोघे एका कार्यक्रमाला जाऊ. नितीनने वैभवच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याच्यासोबत जाण्यास होकार दिला. ठरल्यानुसार दुपारी चार वाजेच्या सुमारास नितीन साहेबराव पाटील आणि वैभव गोकुळ कोळी हे दोघे जण दुचाकीने मुक्ताईनगरला जाण्यास निघाले. नितीन आणि वैभव हे दोघेजण सोबत गेले असल्याचे नितीनचा भाऊ सचिन यास माहिती होते.

रात्री आठ वाजेपर्यंत अधूनमधून नितीनचे त्याचा भाऊ सचिन याच्यासोबत मोबाईलवर बोलणे सुरु होते. मी थोड्यावेळाने घरी येतो असे नितीन त्याचा भाऊ सचिनला मोबाईलवर सांगत होता. त्यानंतर सचिनचा नितीनसोबत संपर्क तुटला. त्याच्या फोनची रिंग जात होती मात्र पलीकडून नितीन फोन रिसिव्ह करत नव्हता. बराच वेळ झाला तरी नितीन घरी परत आला नाही तसेच तो फोन देखील उचलत नव्हता. त्यामुळे त्याचा भाऊ सचिन आणि आई वडील अस्वस्थ झाले.

अखेर सचिनने नितीनसोबत असलेल्या वैभवच्या मोबाईलवर रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास कॉल केला. त्यावेळी वैभवने सचिनला बनावट कथा  सांगून दिशाभुल करण्यास सुरुवात केली. त्याने सांगितले की आम्ही मुक्ताईनगर नजीक कुऱ्हा ते डोलारखेडा दरम्यान जंगल परिसरात दुचाकीने जात होतो. त्यावेळी नितीनची लुट झाली असून त्याचा धारदार शस्त्राने खून झाला आहे. त्यामुळे मी पळून आलो आहे. संतोष कठोरे याने दिलेल्या धक्कादायक माहितीने नितीनचा भाऊ सचिन घाबरला. त्याने तातडीने जळगावच्या त्याच्या काही मित्रांसह मुक्ताईनगरच्या दिशेने मार्गक्रमन केले. रात्र बरीच झाली होती. त्यामुळे सचिनने मदतीसाठी वाटेत भुसावळ येथून देखील काही परिचितांना सोबत घेतले. सर्वांनी समुहाने रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलिस स्टेशन गाठले. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी नितीनचा घातपात व लुट झाली असल्याची माहिती दिली आणि मदतीची मागणी केली.

दरम्यान रात्र गस्तीवर मुक्ताईनगर पोलिसांचे पथक गेले होते. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. आपल्यावर कुणीही संशय घेऊ नये म्हणून वैभव देखील सचिन याच्यासोबत पोलिस स्टेशनला हजर झाला आणि सर्वांना बनावट कथानक सांगून मदत करत असल्याचा देखावा करु लागला. पो.नि. नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला लुटमारीच्या अनुशंगाने तपास सुरु करण्यात आला. कुणीतरी त्रयस्थ व्यक्तीने नितीन पाटील याला लुटले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. शोध सुरु असतांना वाटेत एका ठिकाणी झटापट झाल्याच्या खुणा पोलिस पथकाला आढळून आल्या. बघता बघता पहाटेचे साडेपाच वाजले. तरीदेखील नितीन पाटील याचा शोध लागत नव्हता.

पहाटेच्या सुमारास पुर्णा नदीच्या कठड्यावर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय बळावला. आपल्यासोबत मदत करण्याच्या बहाण्याने फिरत असलेल्या वैभव कोळी याच्यावर पो.नि. नागेश मोहीते यांचा संशय बळावू लागला. याचे कारण म्हणजे तो पोलिसांना जी माहिती देत होता ती सर्व बनावट कथा असल्याचे आढळून आले. तो सांगत असलेल्या माहितीनुसार तपास केला असता त्याच्या बोलण्यात आणि वास्तवतेत विसंगती आढळून आली. पुर्णा नदीच्या कठड्यावर रक्ताचे डाग आढळून आल्याचा धागा पकडून वैभव कोळी याच्यावर संशयाची सुई फिरत होती.

वैभव कोळी याची सखोल चौकशी केली असता अखेर त्याने आपला गुन्हा कबुल केला. कबुलीदरम्यान त्याने या गुन्ह्यात आपला मित्र संतोष कठोरे याचा सहभाग असल्याचे देखील कबुल केले. त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आपला या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही असे म्हणणारा संतोष कठोरे हा देखील कबुल झाला. नितीन पाटील याचा धारदार शस्त्राने खून करुन त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे दोघांनी कबुल केले. त्यामुळे पट्टीच्या पोहणा-यांच्या मदतीने पाण्यातून नितीनचा मृतदेह शोधण्यात आला. भर पावसात नदी पात्रातून नितीनचा मृतदेह शोधण्यासाठी सुमारे चार ते पाच तासांचा कालावधी लागला. 

या घटनेप्रकरणी मयत नितीन पाटीलचा भाऊ सचिन साहेबराव पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.नं. 257/24  नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यांना त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे, हे.कॉ. लिलाधर भोई, राजकुमार चव्हाण, पोलिस नाईक मोतीलाल बोरसे, विजय पढार, प्रदीप इंगळे, पो.कॉ. दिगंबर कोळी, प्रशांत चौधरी, रविंद्र धनगर, सागर सावे, अनिल देवरे, प्रदिप देशमुख, विशाल पवार, इश्वर पाटील, चालक सहायक फौजदार शेख  यांचे या तपासकामी सहकार्य लाभले.

वैभव कोळी याने तो नितीन पाटील याचा मित्र असल्याचा गैरफायदा घेत लपण्याचा आणि गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्न केला. वैभवने नितीनचा कित्येक वर्षापासून विश्वास संपादन केला होता. सामाजिकदृष्ट्या हा खून धक्कादायक म्हणावा लागेल. मैत्रीच्या माध्यमातून त्याने पैसे उधार घेतले आणि ते पचवण्यासाठी संतोष कठोरे याच्या मदतीने खून  केला. हा एकप्रकारे सामाजिक अपराध देखील आहे. या घटनेतून मैत्रीच्या विश्वासाला तडा गेला असल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here