आधी लावले झेंडे नंतर काढले टेंडर — शासन ठेकेदारांपुढे होते का सरेंडर?

जळगाव : आधी टेंडर नंतर काम आणि त्यानंतर फिरवून फिरवून दाम ही शासनाच्या कामाची प्रक्रिया ठेकेदारांसाठी नवीन नसते. आधी टेंडर नंतर काम, दामाचे नंतर त्यापूर्वी टक्केवारी हा विषय देखील ठेकेदारांना अंगवळणी पडलेला असतो. अगोदरची बिले काढल्याशिवाय पुढची कामे करणार नाही या मागणीसाठी घोषणा देत जळगावच्या ठेकेदारांनी आंदोलन देखील केले होते. 

मात्र असे असले तरी शासनाची संगनमताने दिशाभूल आणि पैशांची उधळपट्टी कशी केली जाते याचा एक इरसाल नमुना जळगाव शहरात उघडकीस आला आहे. आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. आधीच काम, आधीच आमदारांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे उद्घाटन आणि त्यानंतर टेंडर असा हा प्रकार उघडकीस आला आहे. 

सन 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय व जीएस ग्राऊंडवर 75 फुट उंचीचे दोन राष्ट्रध्वज उभारण्यात आले. जळगाव शहराचे विधानसभा सदस्य सुरेश दामू भोळे यांच्या आमदार निधीतून 16 लाख 7 हजार 684 रुपये एका ध्वजावर खर्च झाले आहेत. दोन्ही ध्वज उभारण्यासाठी सुमारे 32 लाखांपेक्षा जास्त रक्कम सरकारी तिजोरीतून खर्च झाले आहेत.

या ध्वजांचे अनावरण 15 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले. हे काम संबंधितांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी पूर्ण केले असल्याचा उघड उघड आरोप होत आहे. या दोन्ही ध्वजांची उभारणी झाल्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्याची निविदा काढण्यात आली होती. संगनमताने सरकारी तिजोरीतील खर्चाची उधळपट्टी करण्यासह दिशाभूल करण्याचा प्रकार आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी उघडकीस आणला आहे. आता हे काम जर पूर्ण झालेच आहे तर या कामाचे टेंडर मला 75 टक्के रिकामेपेक्षा कमी रकमेने द्यावे अशी खोचक मागणी गुप्ता यांनी सन 2022 मधे केली होती. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आता या ठिकाणी असलेले ध्वज गायब झाले असून केवळ स्तंभ उभे आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती वजा मागणी आरटीआय कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here