सेवानिवृत्त फौजदाराच्या लाचेची छाप — लिपिकाला बसला धुळे एसीबीचा चाप

धुळे : सेवानिवृत्त सहायक फौजदाराकडून दोन हजार रुपयांच्या लाचेची रक्कम घेणा-या वरिष्ठ लिपीकास एसीबीच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल वसंत गावित असे लाच स्विकारणा-या धुळे पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेतील वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदार हे धुळे पोलिस दलातून सन 2019 मधे सेवानिवृत्त झालेले सहायक फौजदार आहेत. सेवानिवृत्ती नंतर राहिलेली बिले मंजूर होऊन ती मिळण्याकामी त्यांनी 10 जुलै रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयात अर्ज केला होता. त्या बिलापैकी 1 लाख 29 हजार 888 रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले होते. उर्वरीत बिलाच्या रकमेसाठी सहायक फौजदार यांनी वरिष्ठ लिपीक सुनिल गावीत यांची भेट घेतली होती. यापुर्वी जमा झालेल्या बिलाच्या व राहिलेल्या बिलाच्या कामासाठी  कोषागर कार्यालयातील कर्मचा-याच्या नावाने सुनिल गावीत या लिपीकाने त्यांना दोन हजार रुपयांची लाच  मागितली.

सहायक फौजदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी 2 ऑगस्ट रोजी धुळे एसीबी कार्यालयात तक्रार दिली. त्या तक्रारीची एसीबी पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आली. प्रत्यक्ष लाच  घेतांना लिपीकास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध धुळे शहर  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे एसीबीचे पोलिस उप अधिक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा  तपासी अधिकारी रूपाली खांडवी तसेच सापळा पथकातील पो.हवा.राजन कदम,  पो.ना. संतोष पावरा आदींनी या सापळ्याकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here