चोरीच्या वीस मोटरसायकलींसह चोरटे नाशिक ग्रामीण एलसीबीच्या ताब्यात 

नाशिक : महागड्या वीस मोटरसायकली चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोटरसायकल चोरीचे एकुण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. उघडकीस आलेल्या नऊ गुन्ह्यातील हस्तगत वीस मोटर सायकलींची किंमत 14 लाख 25 हजार रुपये आहे. अटकेतील चोरट्यांना घोटी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने आंतर जिल्हा मोटर सायकल चोरी करणा-या आरोपींचे रॅकेट उघडकीस आणून केलेल्या कारवाईत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दिनांक 18 जुन 2024 रोजी घोटी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून दोन मोटर सायकल चोरी झाल्या होत्या. या चोरी प्रकरणी घोटी पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा करत होती. समांतर तपासादरम्यान पो.कॉ. प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वाळुंज एमआयडीसी परिसरातुन पृथ्वीराज भोलेश्वर जंगम (रा. घोटी, ता. इगतपुरी) यास अटक करण्यात आली. 

त्याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या त्याच्या कब्जात असलेल्या अँक्सेस मोपेड व टीव्हीएस स्टार या मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या. अधिक चौकशी व तपासाअंती पुणे जिल्ह्याच्या म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील रहिवासी राजेश दगडु मोहरे यास रात्रभर पाळत ठेवून शिताफिने ताब्यात घेण्यात आले. अटकेतील दोघांसह त्यांच्या दोघा अल्पवयीन साथीदारांचा विविध गुन्ह्यात सहभाग आहे. या चौघांनी  नाशिक जिल्हयातील घोटी, इगतपुरी, वाडीव-हे, सिन्नर, तसेच ठाणे जिल्हयातील शहापुर, खडकपाडा, आणि पुणे जिल्हयातील आंबेठाण, म्हाळुंगे एमआयडीसी, आळेफाटा, मंचर आदी ठिकाणांवरून महागडया मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. 

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे, घोटी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, स्थागुशाचे सपोनि गणेश शिंदे, पोकॉ विनोद टिळे, प्रकाश कासार, संदिप झाल्टे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, घोटी पो.स्टे. चे पोहवा लक्ष्मण धकाते, योगेश यंदे आदिंनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here