मुंबई : कोरोना विषाणूबाबत जनजागृती होण्यासाठी फोनवर सुरुवातीला एक लांबलचक संदेश दिला जात आहे. गेल्या पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या या कॉलर ट्युनला लोक आता वैतागले आहेत. कित्येकांना काहीतरी महत्वाचे बोलणे करायचे असते मात्र या लांबलचक कॉलर ट्युनमुळे वैतागात जास्त भर पडत आहे.
कृपा करुन ही कॉलर ट्युन आता बंद करावी अशी मागणी मनसेने केली होती. त्यानंतर, आता आमदार रोहित पवार यांनी देखील ही कोरोना कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे. आता या कॉलर ट्युनचा लोकांना वैताग आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोना संदर्भात जनजागृतीपर कॉलर ट्युन दूरसंचार विभागाने लॉकडाऊन कालावधीत सुरु केली. प्रत्येक फोन युजर्संने क्रमांक डायल केल्यानंतर ही कॉलर ट्यून त्याला सक्तीने ऐकावी लागत होती आणी लागत आहे. आता बऱ्यापैकी नव्हे तर प्रमाणापेक्षा खुप मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन लागण्यास मोठ्या प्रमाणात विलंब होतो अथवा लागत देखील नाही. याबाबत अतिरेक झाल्यामुळे नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याची स्थिती आहे.
ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, असे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतेच केले. त्यांच्या या मागणीचे नेटीझन्सने समर्थन करत ही मागणी रास्त असल्याचे म्ह्टले आहे. आता, रोहित पवार यांनी देखील केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.