जळगाव- येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गिरीश कुळकर्णी यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला माहिती असावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाचा अभ्यास करावा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरूषांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगितले. तसेच तीन प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास पुस्तक भेट देण्यात आले. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात कुणाल घुगे (इ. १० वी), रमेश पाटील (इ. ८ वी) भारती चव्हाण (इ. ९ वी), वेदांत पाटील (इ. ९ वी), आयेशा पठाण (इ. १० वी) या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिल्याने त्यांने पुस्तक स्वरूपात बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. खंबायत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपशिक्षिका सौ. एच. एम. अत्तरदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विन झाला, विश्वजित पाटील, शुभम व फिरदोस यांचेसह शिक्षक वृंदानी सहकार्य केले.