जळगाव : धरणगाव तालुक्यातील सावदा येथील तरुणाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. लहान भावाच्या दारुच्या व्यसनाला वैतागून मोठ्या भावाने संतापाच्या भरात त्याची हत्या केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. दीपक वाघ असे हल्लेखोर तरुणाचे तर इंदल वाघ असे मयताचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील सावदा येथे इंदल वाघ वास्तव्यास होता. त्याला दारुचे व्यसन मोठ्या प्रमाणात घडले होते. त्यामुळे मद्याच्या नशेत तो पत्नी सोबत वाद घालत असे. त्याच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून त्याची पत्नी जामनेर तालुक्यात माहेरी निघून गेली होती. शनिवार 10 ऑगस्ट रोजी इंदलने दारु पिण्यासाठी त्याच्या आईकडे पैसे मागत वाद घातला होता. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ दीपक याने त्याला मारहाण केली होती.
इंदल बस स्थानकाकडे जात असतांना त्याचा मोठा भाऊ संशयित आरोपी दीपक हा देखील त्याच्या मागे गेला. त्यावेळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. या वादातून दीपकने संतापाच्या भरात इंदलच्या डोक्यात बैलगाडीचे शिंगाडे मारल्याने तो जमीनवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासह पाळधी दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे आदींनी आपल्या पथकासह धाव घेत घटनास्थळाला भेट दिली. तपासांती हल्लेखोर संशयित आरोपी दीपक वाघ यास ताब्यात घेत अटक करण्यात आली याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.