हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या आनंद नगर येथील भाड्याच्या खोलीत २ सप्टेंबर रोजी टाकलेल्या धाडीत १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दोघा अटकेतील आरोपींकडून २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आनंद नगर भागातील भाड्याच्या घरात राहणारा एक इसम त्याच्या महिला साथीदारासह बनावट नोटा छापून त्या व्यवहारात आणत असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पथकाला मिळाली होती.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने २ सप्टेंबर रोजी सापळा रचून धाड टाकली. या धाडीत १००, २००, ५०० आणि २००० रुपये किमतीच्या नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. तसेच पिवळसर धातुच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती, बनावट १७ लाख ४७ हजार ३५० रुपये, प्रिंटर, चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी संतोष जगदेवराव सुर्यवंशी व छायाबाई गुलाबराव भुक्तार या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भा.द.वि. कलम ४८९ (अ),(ब),(क),(ड),(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.