मुंबई : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अजून सुरुच आहे. आज औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली झाली. त्यांच्याजागी निखील गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल गुप्ता हे केंद्रीय नियुक्तीवरुन राज्यात आले आहेत. चिरंजीव प्रसाद यांची बदली नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षक पदी झाली आहे. रविंद्र कुमार सिंघल यांची बदली नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, मुंबई येथे झाली आहे. रविंद्र कुमार सिंघल हे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
के एम एम प्रसन्ना यांची नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षक पदावरुन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झालेली आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सन २००३ – २००५ या कालावधीत निखील गुप्ता हे औरंगाबाद शहरात पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. औरंगाबाद येथून सयुंक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीसेनेत प्रतिनियुक्तीवर त्यांना पाठवण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून काम सुरु केले. यानंतर ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. आता ते हैद्राबाद येथील आयपीएस ट्रेनिंग सेंटर येथे होते. प्रतिनियुक्तीचा पाच वर्षाचा कार्यकळ संपल्यानंतर ते महाराष्ट्र केडर मध्ये पुन्हा आले.
१५ वर्षानंतर गुप्ता हे औरंगाबादला पोलीस आयुक्तपदी बदलून आले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला व अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) रजनीश सेठ यांना अनुक्रमे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नागरी संरक्षण विभागात पदोन्नती मिळाली आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी बीपीन कुमार सिह तर सदानंद दाते यांची मीरा भाईदरच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. गुरुवारी व शुक्रवारी आयजी, अप्पर आयुक्त व अधीक्षकाच्या बदल्याचे आदेश जारी होतील असे सांगण्यात येत आहे.