जळगाव नागरिक मंचच्या वतीने अशोक जैन यांचे राज्यपालांना निवेदन

जळगाव : जळगाव येथे दीड दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने जळगावच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांच्या मागण्या राज्यपालांकडे केल्या. अजिंठा विश्रामगृहावर राज्यपाल नागरिकांना भेटले. याच दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी राज्यपालांची विशेष भेट घेतली.

अशोक जैन यांनी जळगाव नागरिक मंचच्या वतीने   राज्यपालांना निवेदन सादर करीत त्यात मागणी केली की, पुणे – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडोर प्रकल्पात जळगावचा समावेश करावा. हा प्रकल्प जळगाकडे विस्तारला तर दौलताबाद, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, अजिंठा लेणी, गांधीतीर्थ सुद्धा जागतिक पर्यटनाशी जोडले जातील. ग्रीनफील्ड कॅरिडाॅरमुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, शेती उत्पादने, पर्यटन, हाॅटेल्स, ट्रॅव्हल्स अशा व्यवसायांना मोठा आर्थिक लाभ होऊन रोजगार वाढू शकेल. ही बाब अशोक जैन यांनी राज्यपालांकडे स्पष्ट केली.

राज्यपालांनी निवेदन स्वीकारून त्याचा पाठपुरावा केंद्रीय मंत्रालयाकडे करणार असे आश्वासन दिले. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. दरम्यान याच कॅरिडाॅरची मागणी ‘क्रेडाई’ चे पदाधिकारी तथा विकासक अनीषभाई शहा यांनीही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here