पुणे : हनी ट्रॅपच्य माध्यमातून वडगाव शेरी येथील एका व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने पकडल्याची घटना घडली आहे. सापळा रचून खंडणी मागणा-यास पकडण्यात आले. चंदननगर भागातील २६ वर्षाच्या तरुणाला पुणे स्टेशन परिसरात पाच लाख रुपयांची खंडणी स्विकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदाराचा किचनचे साहित्य तयार करण्याचा उद्योग आहे. वडगाव शेरी परिसरात त्यांची बिल्डींग आहे. या बिल्डींगच्या दुसर्या मजल्यावर ते रहात असून इतर खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील एक खोली रिकामी झाल्याने त्यांनी ती खोली आरोपीस भाड्याने दिली होती. इमारतीच्या पार्किंग परिसरात ते दररोज पहाटे सकाळी फिरायला येत होते़. त्यावेळी आरोपीच्या पत्नीने त्यांना पाहिले़ व त्यानंतर त्यांना अश्लिल मेसेज पाठवून भेटण्यास बोलावले़. आरोपीच्य गैर हजेरीत या महिलेने या व्यावसायिकाला घरात बोलावले़. त्यावेळी त्यांच्यात संगनमताने शरीर संबंध झाले़.
त्यानंतर आरोपीची पत्नी या व्यावसायिकासोबत फोनवर सतत बोलत होती. एके दिवशी या व्यावसायिकाला तिने आपल्या घरी नेहमीप्रमाणे बोलावून घेतले़. त्यावेळी आरोपी घरातच बसलेला होता़. दोघांना एकत्र पाहिल्यावर आरोपीने या व्यावसायिकाला मारहाण सुरु केली. मारहाणीत व्यावसायीकाचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला.
दुसऱ्या दिवशी आरोपीने खोली सोडून जात असल्याचे व्यावसायीकास सांगितले. खरोखरच तो दुसऱ्या दिवशी खोली सोडून निघून गेला़. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने या व्यावसायिकाला फोन करुन सांगीतले की तुझे व माझ्या पत्नीचे संबंध असल्याचे मला माहीती होते. त्यामुळे मी अगोदरच घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता. त्या माध्यमातून मी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे.
व्यावसायीक रहात असलेल्या परिसरात ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने व्यावसायीकाला दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी आरोपीने मागितली़. त्यासाठी आरोपी सतत फोन करुन धमकी देण्याचे काम करु लागला़. अखेर या व्यावसायिकाने पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला़. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.
व्यावसायिकाची तक्रार नोंद केली जात असताना आरोपीचा त्यांना फोन आला. यावेळी पाच लाख रुपयांची मागणी आरोपीने तक्रारदार व्यावसायीकास केली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे स्टेशनजवळ सापळा रचला. सापळ्यात या व्यावसायिकाकडून ५ लाख रुपये घेतांना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.