जळगाव : जळगाव शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसरातील एन एन वाईन सेंटर या मद्यविक्रीच्या दुकानातील लाखो रुपयांची रोकड जबरीने घेऊन जाणा-या दोघांना पाळधी येथील साईबाबांच्या मंदिरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. सचिन अभयसिंह चव्हाण (रा.शंकर आप्पा नगर पिंप्राळा जळगाव) आणि अक्षय नारायण राठोड (रा. यश नगर पिंप्राळा जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील एन एन वाईन सेंटर या दुकानात काही इसमांनी दहशत माजवून काउंटर मधील 5 लाख 70 हजार रुपये जबरीने गेले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती.
या गुन्ह्यातील दोघे आरोपी पाळधी येथील साईबाबा मंदिरात लपून बसले असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, राहुल पाटील आदींच्या पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. अटकेतील दोघांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून 68 हजार 500 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली बुलेट जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास कामे दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.