आर्थिक व्यवहार झाला दोघा भावांमधील वादाचे कारण — प्रदीपच्या डोक्यात बॅट घालून सतिषने दिले त्याला मरण

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): दोन सख्खे भाऊ बालपणापासून तरुणपणापर्यंत एकमेकांच्या मदतीला कोणत्याही अडी अडचणीत धावून जातात. जो पर्यंत त्यांचे लग्न होत नाही तोपर्यंत दोघे एकमेकांना सर्वतोपरी मदत  करतात. त्यांच्या मदतीत व्यवहाराचा भाग नसतो. मात्र त्यांचे लग्न झाल्यानंतर, त्यांच्यावर संसाराची जबाबदारी पडल्यानंतर दोघांचे व्यवहार वेगवेगळे होतात. एकमेकांना पैशांची मदत लागली तरी ती मदत करतांना ते पैसे परत देण्याघेण्याचा व्यवहार सुरु होतो. दोघा सख्ख्या भावांमधील आर्थिक व्यवहार सुरळीत राहीला तर त्यांच्यातील संबंध देखील चांगले राहतात. मात्र दोघांमधील व्यवहार विस्कळीत झाला म्हणजे निर्माण झालेला वाद केव्हा कोणते रुप धारण करेल याचा काही नेम नसतो. भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीत एका भावाने दुस-या भावाची व्यवहाराच्या वादातून डोक्यात बॅट  घालून हत्या केल्याची घटना घडली. बिघडलेला व्यवहार सख्ख्या भावाला कशा प्रकारे संताप आणतो आणि त्या संतापातून अप्रिय घटना कशी  घडते हे या घटनेतून दिसून आले आहे.

भारत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या अख्त्यारीतील आयुध निर्माण करणारी फॅक्ट्री जळगाव जिल्ह्यात भुसावळ आणि वरणगाव या दोन ठिकाणी आहे. भुसावळच्या तुलनेत वरणगाव ऑर्डनन्स फॅक्ट्री मोठ्या स्वरुपात आहे. या फॅक्ट्रीमधे प्रदीप जयसिंग इंगळे हे सुपरवायझर पदावर कार्यरत होते. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्ट्रीत काम  करणा-या  अधिकारी व कर्मचारी वर्गास राहण्यासाठी मोठी वसाहत आहे. या वसाहतीला फॅक्ट्री इस्टेट म्हटले जाते. या इस्टेटमधील क्वार्टर क्रमांक 44 थ्री टाईप मधे सुपरवायझर प्रदीप जयसिंग इंगळे हे रहात होते. प्रदीप इंगळे यांच्या पत्नीचा न्यायालयात वाद सुरु आहे. त्यांच्या पत्नीला न्यायालयीन आदेशाने खावटी सुरु आहे. प्रदीप इंगळे यांना एक मुलगा असून तो त्यांच्यासोबत रहात नाही. त्यामुळे मुक्ताईनगर येथील मुळ रहिवासी असलेले प्रदीप इंगळे हे एकटेच फॅक्ट्री इस्टेटमधील क्वार्टरमधे रहात होते.

प्रदीप इंगळे यांचा सख्खा भाऊ सतिष इंगळे हा देखील फॅक्ट्रीमधे कामाला असून इस्टेटमधे राहण्यास आहे. दोघा भावांमधे ब-याच दिवसांपासून घरगुती मालमत्तेचा वाद सुरु होता. भुसावळ येथे घेतलेल्या जमीनीच्या वादातून सतिष हा प्रदीप इंगळे यांना पाच लाख  रुपयांची मागणी करत होता असे समजते. दोघांमधील वाद आजूबाजूच्या रहिवाशांना देखील माहिती झाला होता असे म्हटले जाते.

दि. 11 सप्टेबर 2024 रोजी नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणाच्या सुटीत प्रदीप इंगळे हे क्वार्टरला जेवण करण्यासाठी आले. जेवणाच्या निमित्ताने क्वार्टरला आलेले प्रदिप इंगळे यांची या दिवशी भाऊ सतीषच्या हातून जिवनयात्रा संपुष्टात येणार होती. या दिवशी ते फॅक्ट्रीच्या गेटमधून बाहेर आले ते कायमचेच. क्वार्टरला देखील आले ते अखेरचे.

जेवणासाठी दुपारच्या वेळी प्रदीप इंगळे क्वार्टरला आल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ त्यांचा भाऊ  सतिष हा देखील आला. तो प्लॉटच्या व्यवहारातील पाच लाख रुपयांची मागणी भाऊ प्रदीप यांना करु  लागला. बराच वेळ वाद झाल्यानंतर प्रदीप  इंगळे हे भाऊ  सतिष याला दिड लाख रुपये देण्यास तयारही झाले. मात्र त्यावर सतिषचे समाधान झाले नाही. त्यामुळे तिव्र स्वरुपात त्याचा राग उफाळून आला. या संतापाच्या भरात जवळच पडलेली लाकडी बॅट सतिषने उचलून ती भाऊ  प्रदीप इंगळे यांच्या डोक्यात हाणली.

डोक्यात बॅटचा जोरदार घाव बसताच प्रदीप इंगळे जागेवरच कोसळले. त्यांच्य डोक्यातून, नाकातून व कानातून रक्त निघण्यास सुरुवात झाली. लाकडी बॅटचा घाव  एवढा जोरदार होता की जमीनीवर रक्ताचा थारोळा जमला. या घटनेची माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना समजताच घटनास्थळी सर्वजण जमले. भर दुपारच्या वेळी हा खूनाचा प्रकार बघून काहींनी लागलीच क्वार्टरच्या बाहेर पळ काढला.

या प्रकारानंतर मारेकरी सतिषने स्वत:च  वरणगाव पोलिस स्टेशनला फोन करुन चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभुल करण्यास सुरुवात केली. कुणीतरी आपल्या भावाला ठार  केले असून तो पळून गेला असल्याची सतिषने वरणगाव पोलिस स्टेशनला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांनी सर्वप्रथम या भुसावळ उप विभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांना माहिती दिली. आपण तातडीने घटनास्थळी जावून सत्य परिस्थिती समजून घ्या आणि मारेक-याचा शोध घ्या असे निर्देश डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी स.पो.नि. भरत चौधरी यांना दिले. 

या घटनेची माहिती दर्यापूर येथील रहिवासी तथा वरणगाव फॅक्ट्री बिटचे पोलिस पाटील गिरीष एकनाथ पाटील यांना समजताच ते देखील घटनास्थळी खात्री करण्यासाठी आले. घटनास्थळी प्रदीप इंगळे हे पालथ्या अवस्थेत पडलेले त्यांना दिसून आले. त्यांच्या डोक्यातून, नाकातून आणि कानातून रक्त निघालेले त्यांना दिसून आले. जागेवर रक्ताचे मोठ्या प्रमाणात थारोळे जमले होते. घटनास्थळी मयत  प्रदिप इंगळे यांचा भाऊ सतिष हा हजर  होता. मात्र तो उलट सुलट माहिती देत दिशाभूल करत होता.

दरम्यान घटनास्थळी आपल्या पथकासह आलेल्या स.पो.नि. भरत चौधरी यांनी देखील त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सुरुवातीला दुस-याचे नाव सांगत त्यानेच आपल्या भावाचा खून  केला आणि तो पळून गेला असे सांगू लागला. स.पो.नि. भरत चौधरी यांनी आजूबाजूच्या रहिवाशांच्या चर्चेचा कानोसा घेतला असता मयत  प्रदिप इंगळे आणि त्यांचा भाऊ सतिष इंगळे यांच्यात गेल्या कित्येक दिवसांपासून घरगुती मालमत्तेचा वाद  सुरु होता अशी माहिती मिळाली.

त्यामुळे संशयाची  सुई सतिष इंगळे याच्यावर स्थिरावली होती. त्याला वरणगाव पोलिस स्टेशनला आणुन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्यासमक्ष हजर  करण्यात आले. डीवायएसपी पिंगळे यांच्यासह स.पो.नि. भरत  चौधरी यांनी पोलिसी खाक्या वापरुन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. मात्र भाऊ  प्रदीप यास जीवानिशी मारण्याचा आपला कोणतही हेतू नव्हता असे  देखील त्याने कबुल केले. व्यवहाराच्या वादातून संतापाच्या भरात आपल्या हातून भाऊ प्रदीप याच्या डोक्यावर बॅट मारली गेली. मात्र त्या हल्ल्यात भाऊ  प्रदीप हा जीवानिशी ठार  झाल्याचे सतिषने कबुल केले. सतिषचा स्वभाव हा अतिशय रागीट असल्याचे त्याच्या वर्तनातून आणि बोलण्यातून पोलिसांना जाणवले होते. या घटनेप्रकरणी पोलिस पाटील गिरीष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिस स्टेशनला संशयीत सतिष पाटील याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. भरत चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here