दहा हजाराची लाच – सरपंचासह खाजगी इस्माविरुद्ध गुन्हा 

जळगाव : दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा सरपंच आणि ती स्वीकारणारा खाजगी इसम अशा दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी केलेल्या सापळा कारवाईत दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या खाजगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले. त्या खाजगी इसमाने लाचेची रक्कम सरपंचाच्या सांगण्यावरून घेतल्याचे पंच पडताळणीत निष्पन्न झाले. अनिल विश्राम पाटील असे खडक देवळा बुद्रुक तालुका पाचोरा येथील लाच मागणा-या सरपंचाचे तर बलराम हेमराज भिल असे लाच स्विकारणाऱ्या खाजगी इसमाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक गावाचे रहिवासी असून त्यांचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. परंतु तक्रारदार रहात असलेली जागा त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ – अ मध्ये नावे लावायचे होते. ग्रामसेवकाकडून हे काम करुन घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी तक्रारदारास दहा हजार रुपयांची लाच  मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी जळगांव एसीबी कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीच्या पडताळणीत लाच मागणीचा प्रकार निष्पन्न झाला. लाच घेतांना खासगी इसम बलराम भिल यास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले.

सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोकॉ राकेश दुसाने, कारवाई मदत पथकातील पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव, पोहेकॉ,रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, शैला धनगर, पोना किशोर महाजन, बाळू मराठे, पोकॉ ,प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here