पतीला सोडून करिश्माने धरला धर्मेंद्रचा हात —- चुकीच्या पाऊल वाटेवर झाला तिचा घातपात 

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : करिश्मा (काल्पनिक नाव) तारुण्यात येताच तिच्या आई वडीलांनी तिच्यासाठी योग्य स्थळ बघण्यास सुरुवात केली. भुसावळ तालुक्याच्या एका गावातील उपवर तरुणाचे स्थळ त्यांना करिश्मासाठी योग्य वाटले. त्यामुळे त्यांनी तिचे लग्न त्या तरुणासोबत मोठ्या थाटामाटात लावून दिले. सामाजीक आणि कौटूंबिक जाणीवेतून मुलीचे लग्न योग्य वयात होणे गरजेचे असते या विचारातून करिश्माच्या आई वडीलांनी तिचे लग्न विनाविलंब लावून दिले. विवाहानंतर करिश्मा आपल्या पतीसह संसार करु लागली. विवाहानंतर करिश्माचे सुखाचे दिवस सुरु होते. बघता बघता करिश्माच्या संसार वेलीवर तिन अपत्यांचे आगमन झाले. तिचा संसार भरला आणि बहरला. तिन मुलांची आई असलेली करिश्मा वयाने एकदम तरुण आणि दिसायला देखणी होती. टीव्हीवर दिसणा-या साबणाच्या जाहीरातीमधील आईची भुमिका करणा-या मॉडेलप्रमाणे तिचे सौंदर्य खुलले होते.

करिश्मा रहात असलेल्या गावातच धर्मेंद्र (काल्पनिक नाव) रहात होता. धर्मेंद्र यास मोबाईलमधील विविध प्रकारचे अ‍ॅप हाताळण्याचा  छंद होता. केवळ बारावी पास असलेला धर्मेंद्र जणूकाही मोबाईलपटू होता. व्हाटसअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि विविध मोबाईल अ‍ॅप लिलया हाताळण्यात त्याचे दिवसाचे कित्येक तास सहज निघून जात होते.

4 मार्च हा दिवस धर्मेंद्र साठी “हॅपी बर्थ-डे” असतो. दोन वर्षापुर्वी या दिवशी त्याला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गावातील करिश्माकडून हॅपी बर्थ-डे शुभेच्छा आल्या. गावातील करिश्माने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्याचे बघून धर्मेंद्रची कळी खुलली. त्याने लागलीच तिला आभाराचा रिप्लाय दिला. त्या दिवसापासुन धर्मेंद्र आणि करिश्मा या दोघांच्या मैत्रीचा प्रवास सुरु झाला. दोघांच्या मैत्रीच्या प्रवासाची गाडी एक एक स्टेशन पुढे पुढे धावू लागली. मॅसेजने सुरु झालेली दोघांची मैत्री नंतर मोबाईलवरील व्हाईस कॉल अर्थात संभाषणात परावर्तीत झाली. बघता बघता दोघांची मैत्री फुल क्रिम मिल्कच्या सायीप्रमाणे घट्ट होत गेली. त्यानंतर दोघे एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागले. दोघे एकमेकांसोबत मोबाईलमधे फोटो देखील काढू लागले. सुरुवातीला पॅसेंजर ट्रेनच्या गतीने सुरु झालेली त्यांची प्रेमकथा नंतर सुपरफास्ट मेल एक्सप्रेसच्या गतीने धावत हिट झाली.  

“इश्क और मुश्क छुपाये नही छुपता” असे कुणीतरी म्हटले आहे. कस्तुरीमृगाच्या नाभीतून पसरणा-या सुगंधाप्रमाणे त्यांच्या लव्ह स्टोरीचा सुगंध अख्ख्या गावात दरवळू लागला. त्यांची लव्ह स्टोरी त्या गावात एक चर्चेचा विषय झाली. त्या लहानशा गावातील रहिवाशांच्या जिभेवर करिश्मा आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकथेची चर्चा कॅडबरीप्रमाणे चघळली जाऊ लागली.

धर्मेंद्रचे प्रेमप्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्याच्या आईवडीलांनी त्याच्यासाठी वधू संशोधनाचे काम सुरु केले. धर्मेंद्रच्या करिश्मावरील प्रेमाच्या लाटा अजून उसळण्यापुर्वी त्याचे लग्न उरकण्यासाठी त्याचे आई वडील सक्रिय झाले. त्यांनी त्याच्यासाठी वधू संशोधनाच्या कामाला तेज धार लावली. अखेर धर्मेंद्रसाठी एक स्थळ निश्चित झाले. त्या स्थळासाठी त्याच्या आईवडीलांनी  यशस्वी बोलणी केली. लवकरच त्याचा साखरपुडा करण्याचे देखील नियोजन झाले.

या गोष्टीची भनक करिश्माला लागली. अगोदरच विवाहीत आणि पतीपासून तिन मुले असलेली करिश्मा अविवाहीत धर्मेंद्रच्या प्रेमात पडली होती. वास्तविक तिला तिचा संसार होता. आपल्या संसाराकडे प्रामाणीकपणे लक्ष देणे तिचे काम होते. मात्र असे असतांना देखील ती धर्मेंद्रच्या प्रेमात आकंठ बुडाली. काही महिन्यापुर्वी धर्मेंद्रचा साखरपुडा ठरला असल्याचे समजताच ती त्याच्यावर चिडली. तिने थेट त्याचे घर गाठले. गेल्या दोन वर्षापासून आपले एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे मी तुझे लग्न होऊ देणार नाही असे तिने त्याला खडसावत एक प्रकारे गर्भीत धमकीच दिली. बराच वेळ वाद घातल्यानंतर ती आपल्या घरी निघून गेली.

Sanjay Sapkale – Tayade Hc

एके दिवशी करिश्माने धर्मेंद्रच्या भावी पत्नीचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता शोधून काढला असे सांगितले जाते. त्याच्या भावी पत्नीच्या नातेवाईकांना करिश्माने तिचे आणि धर्मेंद्रचे एकत्रीत काढलेले फोटो पाठवल्याचे देखील म्हटले जाते. त्यामुळे धर्मेंद्रचा होऊ घातलेला साखरपुडा मोडल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींचा परिपाक म्हणून धर्मेंद्रला करिश्माचा राग आला. त्या रागाच्या भरात अथवा अन्य काही गोष्टींमुळे धर्मेंद्र तिच्यावर चिडला होता.

चिडलेल्या धर्मेंद्रने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता करिश्माने त्याला शिवीगाळ सुरु केली. शब्दामागे शब्द वाढत होता. धर्मेद्रचा संयम सुटला त्यामुळे त्याने तिला मारहाण केली. या शिवीगाळ आणि मारहाणीतून करिश्माने धर्मेंद्रविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. सुरुवातीचे काही दिवस दोघांनी एकमेकांसोबत अबोला धरला. पुन्हा काही दिवसांनी दोघांमधे प्रेमाचा अंकुर फुलला आणि त्यांचा अबोला सुटला. दोघे पुर्वीसारखे एकमेकांसोबत गुलुगुलू बोलू लागले आणि खुदूखुदू हसू लागले. मात्र करिश्मा आणि धर्मेंद्रचे प्रेमसंबंध सा-या गावात जाहीर झाले होते. तसेच दोघांच्या प्रेमाची ख्याती करिश्माच्या पतीसह नातेवाईकांपर्यंत पोहोचली. आपली पत्नी गावातील धर्मेंद्रच्या प्रेमात पडल्याची माहिती करिश्माच्या पतीला समजल्यानंतर तो मनाने व्यथीत झाला. मात्र आपल्या संसाराचे हित लक्षात घेत त्याने तिला समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर तो एकटाच आपल्या आई वडिलांकडे राहण्यास निघून गेला. पती आपल्याला सोडून गेल्याचे बघून करिश्मा तिघा मुलांच्या साथीने स्वतंत्र राहू लागली. त्यामुळे धर्मेद्र आणि करिश्मा या दोघांना एकमेकांना भेटण्यासाठी रान मोकळे झाले.

एके दिवशी धर्मेंद्र हा करिश्मा सोबत बोलत बसला होता. त्यावेळी त्याने तिचा मोबाईल तपासला. तिच्या मोबाईलच्या फेसबुक मॅसेंजर चॅटमधे गावातीलच जितेंद्र  (काल्पनिक नाव) नावाच्या तरुणाचे चॅट त्याला बघण्यास मिळाले. त्यावर त्याने तिला विचारणा केली. त्यातून दोघांमधे वाद निर्माण झाला.

करिश्मा आपल्या व्यतिरिक्त जितेंद्र  सोबत देखील प्रेमसंबंध ठेवत असल्याचे समजल्यानंतर धर्मेंद्र मनाने खचला. त्यातून दोघांमधे वादाची ठिणगी पडली. करिश्मा आपल्यासोबत बोलते आणि जितेंद्र  सोबत राहते हे बघून धर्मेंद्रला तिचा राग आला. एकदा रात्रीच्या वेळी करिश्मा नटून थटून प्रणयी स्वरुपातील वस्त्र परिधान करुन जातांना धर्मेंद्रने पाहिले. एवढ्या रात्री करिश्मा नटून थटून कुठे जात आहे हा प्रश्न त्याला पडला. त्याने तिची वाट अडवून तिला तु एवढ्या रात्री कुठे जात आहे अशी विचारणा केली. त्यावर तीने त्याला असमाधानकारक उत्तरे देण्यास सुरुवात केली. तिचे वर्तन आणि वक्तव्य योग्य नसल्याचे बघून धर्मेंद्रने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ती नव्याने मित्र झालेल्या जितेंद्रच्या नादी लागली होती. त्यामुळे तिला आता धर्मेंद्र नकोसा झाला होता. दोघांमधे जोरजोरात शिवीगाळ सुरु झाली. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून तिचा नवा प्रेमी जितेंद्र  त्याठिकाणी धावत आला.

करिश्मा आपले ऐकत नसल्याचे बघून संतप्त धर्मेंद्रने चाकूचे वार करिश्माच्या पाठीवर, पोटाच्या बाजूला आणि  उजव्या हातावर केले. या चाकूहल्ल्यात जखमी करिश्मा जमीनीवर कोसळली. करिश्मा चाकू हल्ल्यात जखमी झाल्याचे बघून तिचा बचाव करण्यासाठी जितेंद्र  धावून आला. तु आमच्या मधे पडू नको, नाहीतर तुला देखील मारुन टाकेन असे धर्मेंद्रने जितेंद्र  यास धमकावले. या चाकू हल्ल्यात जितेंद्रच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. दरम्यानच्या कालावधीत काही गावकरी जमा झाले. मात्र धर्मेंद्रच्या हातातील चाकू बघून कुणीही पुढे येण्यास धजावला नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या करिश्माला गावातील एका सुज्ञ नागरिकाने त्याच्या चारचाकी वाहनाने दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी करिश्माला तपासून मयत  घोषित केले.

या घटनेची माहिती समजताच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश गायकवाड यांनी आपल्या सहकारी सहायक फौजदार बाळू पाटील, रियाज काझी, हेड कॉंस्टेबल संजय सपकाळे यांच्यासह घटनास्थळी धाव  घेत पुढील कारवाई आणि तपासाला वेग दिला. हल्लेखोर धर्मेंद्रला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गु.र.न. 205/2024 भारतीय न्याय संहिता 103/1, 352, 351 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डिवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश गायकवाड व त्यांचे सहकारी करत आहेत. (या कथेतील करिश्मा, धर्मेंद्र आणि जितेंद्र  ही नावे काल्पनिक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here