विश्व अहिंसा दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले आहे. अहिंसा सद्भावना शांती यात्रेसह देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात समस्त जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

अहिंसा सद्भावना शांती यात्रा ही लालबहादूर शास्त्री टॉवर पासून आरंभ होऊन नेहरू चौक – शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचेल. या यात्रेत जिल्हा पालक मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे(राजूमामा), आ. लताताई सोनवणे, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री अंकित, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, डॉ. भरत अमळकर, जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन या मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी उद्यानातील सर्व उपस्थितांना अहिंसा शपथ देण्यात येईल. महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे.

गांधी जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जळगाव तालुक्यातील शाळांसाठी शहरी व ग्रामीण गटात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे सकाळी १० वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी संघांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येईल. आपला जन्मदिवस हा चरखा जयंती म्हणून साजरा व्हावा असे महात्मा गांधीजींनी म्हटल्यानुसार हा दिवस चरखा जयंती म्हणूनही साजरा केला जातो. चरखा जयंतीच्या निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी तीर्थ येथे सकाळी ८.०० ते रात्री ८.०० दरम्यान अखंड सुत कताई करण्यात येणार आहे. संस्थेचे सहकारी सुत कताई करतील, यामधे चरखा चालवू इच्छिणारे वा शिकणेसाठी पण सहभागी होता येणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये जळगावकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here