कांदा, टोमॅटो पीक परिसंवाद उत्साहात

साकरी, ता. भुसावळ दि.१० (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील काळी कसदार जमीन, पाण्याची उपलब्धता आणि कष्टाळू शेतकरी आहेत. रावेर व भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची तुलना केली असता रावेर तालुक्याचा शेतकरी केळी, कापूस, कांदा, सोयाबीन, टोमॅटो इत्यादीचे सर्वाधिक उत्पादन घेतो. असे का याचे चिंतन केले असता आपण उच्च कृषि तंत्रज्ञान आणि आधुनिक सिंचन तंत्राचा म्हणावा तसा उपयोग करत नाहीत.

भरघोस उत्पादनासाठी ठिबक सिंचन व उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापकीय डी.एम. बऱ्हाटे यांनी केले. भुसावळ तालुक्यातील साकरी येथील राधा-कृष्ण मंदिराच्या आवारात ०९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेत्रा अॅग्रो सर्व्हिसेस आणि जैन इरिगेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कांदा, टोमॅटो पीक परिसंवाद’ कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, साकरी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चोपडे, करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा, कृषितज्ज्ञ श्रीराम पाटील आणि व्ही.आर. सोळंकी आणि नेत्रा अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक उमाकांत भारंबे उपस्थित होते.

आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजन करून या परिसंवादास सुरूवात झाली. जैन इरिगेशनचे कृषीतज्ज्ञ श्रीराम पाटील यांनी करार शेती, हमीभाव योजना याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात पांढरा कांदा करार शेती यशस्वी करून दाखविणारी जैन इरिगेशन कंपनी आहे. आता कांद्या बरोबर टोमॅटो, हळद या पिकांसाठी देखील करार शेती उपक्रमात शेतकरी सहभागी होऊ शकतात व आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करू शकतात. कृषितज्ज्ञ व्ही. आर. सोळंकी यांनी पिकांवरी कीड व रोग, खत  व्यवस्थापन याबाबतच्या तांत्रिक गोष्टींवर मार्गदर्शन केले. करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी इतर पिकांच्या तुलनेत कांदा, टोमॅटो पीक घेणे कसे फायद्याचे याबाबत सोदाहरण सांगितले. या करार शेती अंतर्गत साकरी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जैन इरिगेशन योग्य ते मार्गदर्शन व लागणारे तंत्र बांधापर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठ्याभाऊंनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांचा हा वारसा पुढील पिढी चालवित आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कंपनीचे सर्व संचालक व सहकारी कटीबद्ध आहेत.पारंपरिक शेतीत न अडकता शेतकऱ्यांनी स्मार्ट शेती करावी असे आवाहन गौतम देसर्डा यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विभागाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक ए.डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी केले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here