जळगाव : डोक्यावर झालेल्या गंभीर हल्ल्याच्या गुन्ह्यातील पिडीत रुग्णास दोघा वेगवेगळ्या डॉक्टरांनी वेगवेगळे अभिप्राय दिले. नंतर सुधारीत सौम्य अभिप्राय देण्यात आला. सुधारीत सौम्य अभिप्राय देत संशयीत आरोपींना वाचवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अभिप्रायाशी मिळता जुळता अभिप्राय खासगी रुग्णालयाने तब्बल आठ ते नऊ महिन्याने पोलिस प्रशासनाला दिला आहे. नऊ महिन्यानंतर रुग्णाला न बोलावता, न तपासता, खात्री न करता खासगी डॉक्टरांना सुधारीत अभिप्राय देण्याचा असा कोणता साक्षात्कार झाला? असा प्रश्न पिडीत रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना पडला आहे.
जळगावच्या शिवाजी नगर अमन पार्क परिसरात 25 नोव्हेंबर 2023 रोजी नदीम शेख सलीम, वाहीद शेख असद, खलील शेख लतीफ आणि वसीम शेख लतीफ या चौघांनी रईस शेख रशिद शेख या तरुणाच्या डोक्यावर आपसी वादातून हल्ला केला होता. चाकूसारख्या धारदार वस्तूसह लाकडी दांडक्याचा या हल्ल्यात वापर झाला होता. गु.र.न. 376/23 भा.द.वि. 141, 143, 147, 149, 323, 324, 504 नुसार या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला 26 नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रईस शेख या जखमी तरुणास वैद्यकीय उपचारकामी दाखल करण्यात आले होते. सिटी स्कॅन अहवाल येण्यापुर्वी 26 नोव्हेंबरच्या सुरुवातीला मध्यरात्री याप्रकरणी Type of injury – simple असा लेखी अभिप्राय देण्यात आला. त्यानंतर पुढील उपचारार्थ जखमी रईस शेख या तरुणास शाहू नगर येथील गॅलक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधे दाखल करण्यात आले.
5 जानेवारी 2024 रोजी गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉ. राजेश पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार पिडीत जखमी रुग्णाच्या डोक्यावर टणक वस्तूने मार लागल्याने झालेल्या जखमा गंभीर होत्या. दरम्यानच्या काळात जखमी तरुणासह त्याच्या नातेवाईकांनी या गुन्ह्याच्या तपासाचा सखोल पाठपुरावा सुरु ठेवला. या कालावधीत जखमीच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलिस अधिका- यांसोबत संपर्क कायम ठेवत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर 10 सप्टेबर 2024 रोजी डॉ. राजेश पाटील यांनी पोलिसांना एक नवीन दाखला दिला. त्या दाखल्यात नमुद करण्यात आले की माझे पुर्वीचे गॅलक्सी हॉस्पिटल या नावाने सुरु असलेले हॉस्पीटल बंद झाले असून अश्विनी मल्टीस्पेशालिटी हे हॉस्पीटल सुरु आहे. 26 नोव्हेंबर रोजी आपल्या दवाखान्यात दाखल रईस शेख या जखमी तरुणास मी तपासले होते, मात्र कामाच्या अती व्यापात मी त्यास गंभीर जखमा झाल्याचा अहवाल दिला. कामाच्या अती व्यापामुळे आपण चुकीचा अभिप्राय दिला आहे. रुग्णाच्या जखमा गंभीर नसून साध्या होत्या. झालेल्या चुकीबद्दल हा अहवाल देण्यात येत आहे. मात्र रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना प्रश्न असा पडला आहे की डिस्चार्ज दिल्यानंतर आठ ते नऊ महिन्यानंतर आपल्याला न बोलावता, न तपासता परस्पर डॉक्टरांची समरणशक्ती एवढी प्रबळ कशी झाली? पुर्वीचा दाखला देतांना कामाचा व्याप होता आणि आताच नवा दवाखाना सुरु झाल्यानंतर कामाचा व्याप एकाएकी कसा काय कमी झाला? या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले असल्याचे समजते.