एकाच महिलेवर दोघांचे प्रेम, त्यातून झाला नंदूचा गेम – जमिनीतील सांगाड्याने तयार झाली तपासाची फ्रेम

बुलढाणा (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी वाईट असतो हे कित्येक उदाहरणातून आपण पाहिले आहे. तब्बल दोन वर्षापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा जमिनीतून सांगाडा बाहेर काढल्यानंतर अनैतिक संबंधातून झालेल्या खूनाचा उलगडा बुलढाणा पोलिसांच्या तपासात झाला. एकाच महिलेवर दोघांचे प्रेम व दोघांच्या मदतीने एकाचा खून असा या गुन्ह्याचा घटनाक्रम होता. तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला आणि कृर हत्येनंतर मृतदेह जमिनीत पुरल्याचे सत्य बाहेर आले.  बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत हा धक्कादायक गुन्हेगारी घटनाक्रम उघडकीस आला आहे.

हिवरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपुर येथे नंदू श्रीराम धंदरे हा इसम रहात होता. श्रीराम धंदरे हा इसम अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कारकून म्हणून नोकरी करत होता. नंदू धंदरे याच्या एका जवळच्या नातेवाईक महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे ती महिला विधवा झाली होती. या विधवा महिलेवर नंदू धंदरे यांचे प्रेम जडले होते. वास्तविक नंदू धंदरे हा विवाहित होता. मात्र तरी देखील जवळच्या विधवा नातेवाईक महिलेसोबत त्याने प्रेमाचा सिलसिला सुरु केला. काही दिवसांनी याच महिलेवर गणेशपुर परिसरातीलच अतुल गंगाराम कोकरे या तीस वर्षाच्या तरुणाचे देखील प्रेम जडले. तो देखील या विधवा महिलेवर प्रेम करु लागला. अशाप्रकारे एकाच महिलेच्या मागेपुढे नंदू धंदरे आणि अतुल कोकरे हे दोघेजण घुटमळू लागले. ती महिला या दोघांना आलटून पालटून चोरुन लपून भेटत होती. हे दोघेजण देखील तिला चोरुन लपून भेटत होते. अशा प्रकारे दोघेजण एकाच महिलेवर जीव ओवाळून टाकत होते. 

मयत नंदू

आपण दोघे एकाच महिलेवर प्रेम करत असल्याचे या दोघांना काही दिवसांनी समजले. ती विधवा महिला नंदू धंदरे याची जवळची नातेवाईक होती. त्यामुळे अतुल कोकरे याचे तिला भेटणे नंदूला सहन झाले नाही. त्यामुळे नंदू हा अतुलवर चिडून होता. नंदू आपल्याला त्रासदायक ठरत असल्याचे अतुल यास कळून चुकले होते. आपण नंदूला ठार केले नाही तर नंदू आपल्याला ठार करेल अशी भीती अतुल या सतावत होती. त्यामुळे अतुल याने त्याचा मित्र दिपक शालीग्राम ढोके याच्या जवळ त्याच्या मनातील भीती व्यक्त केली. अतुल आणि दीपक हे दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त होते. त्यामुळे संकटात सापडलेल्या अतुलच्या मदतीला दीपक नेहमी धावून जात होता. त्यामुळे अतुल आणि दीपक या दोघांनी नंदू यास जीवानिशी ठार करण्याचे निश्चित केले. 

नंदू धंदरे याला कायमचे संपवण्याचा डाव या दोघांनी आखला. 18 ऑक्टोबर 2022 हा नंदूच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला. अतुल आणि दीपक या दोघांच्या माध्यमातून नियतीने हा दिवस नंदूसाठी अखेरचा दिवस निश्चित केला होता. या दिवशी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान नंदू त्याच्या शेतात आला असता लपून बसलेल्या अतुलने फावड्याच्या लाकडी दांड्याने व दगडाने ठेचून नंदू श्रीराम धंदरे याची हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यात नंदू ठार झाला. मरण पावलेल्या नंदूचा मृतदेह गणेशपूर ते उंद्री रस्त्यावरील शेताच्या बांधावर दोघांनी पुरला. मृतदेह पुरण्याकामी अतुल यास त्याचा मित्र दीपकने मदत केली. त्यानंतर मरण पावलेल्या अतुलची मोटरसायकल मेहकर मार्गावरील नदीत दोघांनी फेकून पुरावा नष्ट केला. 

बराच वेळ झाला तरी आपला पती नंदू हा घरी का आला नाही या विचारात त्याची पत्नी सविता पडली होती. बराच वेळ वाट बघूनही नंदू घरी आला नाही. त्यामुळे सविताने हिवरखेड पोलीस स्टेशन गाठत पती बेपत्ता झाल्याबाबत मिसिंग दाखल केली. 14/2022 या क्रमांकाने दाखल मिसिंगचा तपास हिवरखेड पोलिसांनी सुरु केला. मात्र त्यात यश येत नव्हते. बघता बघता दोन वर्षाचा कालावधी उलटला. 

हिवरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी यांच्यासह हे.कॉ. विठ्ठल चव्हाण, पोलिस नाईक प्रविण जाधव, पोकॉ. महेंद्र नारखेडे आदींचे एक शोध पथक तयार करण्यात आले. पोलिसांच्या दृष्टीने बेपत्ता नंदू धंदरे याचा मोबाईल नंबर तसेच इतर संशयीतांचे मोबाईल नंबर व त्यांचे लोकेशन आदींची माहिती संकलित करण्यात आली. नंदू धंदरे याचे कुणासोबत पैशांचे, जमिनीचे अथवा प्रेम संबंधाचे काही वाद होते का याबाबत देखील गोपनीय माहिती संकलित करण्यात आली. याशिवाय काही गुप्त बातमीदार कामाला लावण्यात आले. तसेच याबाबत कुणाला काही माहिती असल्यास ती गुप्त माहिती देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस गणेशपुर गावात आणि पोलीस स्टेशन परिसरात पोस्टरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. 

दरम्यान तपास थंड वस्त्यात गेला अशी चर्चा सुरू झाली. मात्र गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नंदू धंदरे आणि अतुल कोकरे हे एकाच महिलेवर प्रेम करत होते आणि त्यातून हा घातपात झाला असावा अशी माहिती पोलीस पथकाला समजली. अतुल कोकरे याचा जिवलग मित्र दीपक शालिग्राम ढोके हा याबाबत खात्रीलायक माहिती देऊ शकतो अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे अतुल आणि दीपक या दोघांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम सुरु करण्यात आले. 

दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी दीपक शालिग्राम ढोके यास चौकशीकामी हिवरखेड पोलीस स्टेशनला बोलावून त्याची सखोल विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चतुराई आणि त्यांचा खाक्या बघून दीपक ढोके याने आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यात अतुल याचा देखील सहभाग असल्याचे दिपकने कबूल केले. दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान नंदूला त्याच्या शेतात फावड्याच्या लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण करुन अतुलने ठार केल्याचे दीपकने कबूल केले. त्याचा मृतदेह पूरण्याकामी आपण मदत केल्याचे देखील दीपकने पोलीस पथकास कथन केले. मयत नंदूची मोटर सायकल मेहकर मार्गावरील पुलावरुन नदीत फेकून दिल्याचे दीपकने कथन केले. त्यानुसार अतुल कोकरे याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

एसडीपीओ ठाकरे, कार्यकारी दंडाधिकारी जाधव, गणेशपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पागोरे व इतर पोलीस व गावातील नागरिक आदींच्या उपस्थितीत संशयित आरोपींनी दाखविलेल्या घटनास्थळी खोदकाम केले असता मयत नंदू श्रीराम धंदरे याचा हाडांचा सापळा आढळून आला. त्यानुसार दोघांविरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोहेकॉ विठ्ठल चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार हिवरखेड पोलीस स्टेशनला गु.र.न. 216/2024 भा.द.वि. कलम 302, 201, 34 प्रमाणे दोघा संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी, पोलीस हवालदार  विठ्ठल चव्हाण, नायक पोलीस जमादार  प्रविण जाधव, पोलीस जमादार महेंद्र नारखेडे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास हिवरखेड पो. स्टे. चे प्रभारी अधिकारी कैलास चौधरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here