लाचेचे टार्गेट दहा लक्ष, स्विकारले दोन लक्ष — संस्था सचिव विनोद ठरला एसीबीचे भक्ष

जळगाव : दहा लाख रुपयांची लाच मागणी ठरवून दोन लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याची लाच स्विकारणारा शैक्षणिक संस्था सचिव जळगाव एसीबीच्या ताब्यात सापडला. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद मधुकर चौधरी असे वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था पिंपरी खुर्द तालुका धरणगाव येथील लाचखोर सचिवाचे नाव आहे. 

या घटनेतील तक्रारदार एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथील रहिवासी आहे. तक्रारदाराचा मुलगा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था संचलित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भोद खुर्द या ठिकाणी सन 2021 पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई रिक्त पदावर नोकरीस होता. तक्रारदाराचा मुलगा नोकरीस लागतांना सचिव विनोद चौधरी याने त्यांच्याकडून 7 लाख 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदाराच्या शिपाई पदावरील मुलाचे वय कमी असल्याचे सांगून त्यास नोकरीवरुन गेल्या महिन्यात कमी केले होते. शिपाई पदाची जागा सन 2012 पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांच्या भाच्याला शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी, शासनाकडून मंजुरी आणून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी 10 लाख रुपयांची सचिवाने लाच मागणी केली. त्यात तात्काळ 2 लाख रुपये, शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर 3 लाख रुपये व पहिला पगार सुरु होईल तेव्हा 5 लाख रुपये अशी टप्प्या-टप्प्याने 10 लाख रुपयाची मागणी केली. तसेच यापुर्वी स्विकारलेले सुमारे 7 लाख 70 हजार रुपये विसरून जा असे सचिवाने तक्रारदारास सांगितले. 

लाचेच्या या रकमेचा दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता 17 ऑक्टोबर रोजी सचिव विनोद चौधरी याने त्याच्या राहत्या घरी जळगाव येथे तक्रारदाराकडून स्विकारला. लाच स्विकारताच एसीबीच्या सापळा पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.ना. सुनील वानखेडे, पो.कॉ.प्रणेश ठाकूर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना कारवाई मदत पथकातील सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोलिस नाईक बाळू मराठे, पोना किशोर महाजन, पोकॉ प्रदिप पोळ पोकॉ राकेश दुसाने आदींचे सहकार्य लाभले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here