जळगाव : कंत्राटी कामाचे बिल आणि वर्क ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची लाच मागणी करण्यासह त्या मागणीस प्रोत्साहन देणाऱ्या एकुण पाच जणांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईने पारोळा परिसरात खळबळ माजली आहे. किशोर दत्ताजीराव शिंदे (गट विकास अधिकारी, पंचायत समिती,पारोळा), सुनील अमृत पाटील (विस्तार अधिकारी,पंचायत समिती, पारोळा), गणेश प्रभाकर पाटील (विस्तार अधिकारी,पंचायत समिती,पारोळा), अतुल पंढरीनाथ पाटील (वरिष्ठ लिपिक,पंचायत समिती,पारोळा), योगेश साहेबराव पाटील (कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती,पारोळा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यात दलीत वस्ती सुधार योजनेसह विविध शिर्षकाखाली एकुण 90 लाख रुपयांची सहा विकास कामे घेतली होती. या कामांचे उर्वरित बिल आणि इतर काही कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
दि.18 जुलै 2024 ते दि. 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी तक्रारदारास 2 लाख रुपये लाच रकमेपैकी 50 टक्क्याप्रमाणे एक लाख रुपये लाच रक्कम समायोजित करुन किशोर शिंदे यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन देत समर्थन केले. इतर तिघांनी सुद्धा या लाच मागणीच प्रोत्साहन देत समर्थन केले. याप्रकरणी सर्व पाच जणांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक तथा पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.ना. सुनील वानखेडे, पो.कॉ. राकेश वानखेडे तसेच कारवाई मदत पथकातील पोहेकॉ रविंद्र घुगे, शैला धनगर, पोना बाळू मराठे, पोना किशोर महाजन , पोकॉ ,प्रणेश ठाकुर, पोकॉ प्रदीप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.