जळगाव : प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच मागणी करुन दोन हजार रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता स्विकारणा-या चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबलसह पंटरला धुळे एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. जयेश रामराव पवार असे हेड कॉन्स्टेबलचे तर सुनिल श्रावण पवार असे खासगी पंटरचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी दोघांविरुद्ध करण्यात आलेल्या या कारवाईने चाळीसगाव शहर व ग्रामीण परिसरात खळबळ माजली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याशी संबंधीत प्रतिबंधात्मक कारवाईत मदत केली म्हणून आणि पुढेही त्रास होऊ नये यासाठी चार हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. यापैकी दोन हजार रुपये पहिल्या हप्त्यापोटी स्विकारण्याचे ठरले.
याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार रचण्यात आलेल्या सापळ्यात अगोदर खासगी पंटर सुनिल पवार यास व नंतर हे.कॉ. जयेश पवार यास ताब्यात घेण्यात आले. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजन कदम, हवालदार पावरा, सुधीर मोरे, रामदास बारेला मदत आदींनी या पथकात सहभाग घेतला.