मुंबई : उत्तर प्रदेशात उद्योगपती आणि राजकीय नेत्याची हत्या केल्यानंतर गेल्या एक वर्षापासून फरार असलेल्या उत्तर प्रदेशातील कुख्यात मिर्ची गँगच्या म्होरक्यास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा ११ ने ही कारवाई पुर्ण केली आहे. प्रवीण उर्फ आशु उर्फ आकाश राजेंद्र सिंग (३२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो विलेपार्ले पश्चिम परिसरातील इर्ला मार्केटनजीक आलुवाडी येथे रहात होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी आहे.
सप्टेंबर २०१९ या कालावधीत धौलाना पोलीस स्टेशन (जिल्हा- हापुड, उत्तर प्रदेश) च्या हद्दीत कुख्यात मिर्ची गँगचा म्होरक्या व साथीदारांनी भर दिवसा चारचाकी वाहनातुन येवुन गोळीबार करत भाजपा स्थानिक नेता राकेश शर्मा (३५) याची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. त्याबाबत धौलाना पोलीस स्टेशन (जिल्हा- हापुड़, उत्तर प्रदेश) येथे भादवी कलम ३०२, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल झाला होता.
याशिवाय जानेवारी २०२० मध्ये फेज-३, नोएडा पोलीस स्टेशन हद्दीत नोएडा येथील प्रसिध्द उद्योगपती गौरव चांडेल (४५) यांची कुख्यात मिर्ची गॅगच्या म्होरक्या व साथीदारांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली होती. हत्येनंतर त्यांची किया सेल्डोज कंपनीची कार जबरीने चोरुन नेली होती. याप्रकरणी फेज-३, नोएडा पोलीस स्टेशन येथे भादंवि ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिर्ची गॅंग ही गुन्हे करण्यासाठी जबरीने चोरलेल्या वाहनांचा वापर करत होती. मिर्ची गँगच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे या प्रवीण उर्फ आशू उर्फ आकाश राजेंद्र सिंग नावाच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलीसांनी २,५०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे.