जळगाव : नवीन पोलवरुन वीजपुरवठा देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या दुस-या वरिष्ठ वायरमनला देखील अटक करण्यात आली आहे. श्रीकांत कोमलसिंग पाटील असे अटक करण्यात आलेल्या दुस-या तंत्रज्ञाचे नाव आहे. एसीबी पथकाने त्याला अटक केली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या लाच प्रकरणातील तक्रारदाराच्या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. या पोलवरुन वीज पुरवठा सुरु करण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालयात जावून वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र त्यांना तिस हजार रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती. या तिस हजार रुपयांपैकी त्यांनी दहा हजार रुपये लाच दिली होती. तरी देखील त्यांना विज पुरवठा देण्यात आला नव्हता.
उर्वरित विस हजार रुपयांची लाच घेतांना वायरमन विक्रांत भरत नाईक याला जळगाव येथे अटक करण्यात आली होती. या लाच प्रकरणात श्रीकांत पाटील या वायरमनचा देखील सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली आहे.