जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : आजची तरुण पिढी हिंदी सिनेमातील “अॅंग्री यंग मॅन” प्रमाणे आवेशात वागत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. हिंदी सिनेमातील एक हिरो चार पाच गुंडांना ठोकून काढतो. सिनेमातील अशा काल्पनिक घटना बघून तरुण पिढी देखील तसेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. वास्तविक पडद्यावरचा सिनेमा हा काल्पनिक असतो आणि आपले जीवन हे वास्तव असते. या वास्तवाची जाणीव ठेवून काम केले तर जीवनाचा विस्तव आणि त्याची राख होत नाही. मात्र तारुण्याचा जोश तरुणांचे होश गमावण्याचे काम करते. अशा मारधाड सिनेमातील काल्पनिक घटनांचे भांडवल करुन सिनेमा निर्माते आपला गल्ला भरण्याचे काम करतात.
आपली सारासार विवेक बुद्धी शाबुत ठेवून शांत डोक्याने विचार करुन निर्णय घेतला तर तो आपल्या फायद्याचाच ठरतो. तरुणपणातील चुका वृद्धापकाळात समजतात त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. त्यासाठी योग्य वेळी योग्य बुद्धी वापरण्याची गरज असते. असे झाले तर जीवन सहज आणि सुलभ होते. मात्र तरुणाईत सहसा तसे होत नाही. अमळनेर या तालुक्याच्या ठिकाणी एका तरुणाच्या बुलेटला चारचाकी वाहनाचा धक्का लागून इंडिकेटर तुटण्याचा वाद वाढत गेल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली. या घटनेचे पर्यावसन चारचाकी वाहनातील तरुणांकडून बुलेटधारकाला मारहाणीत झाले. सिनेस्टाईल पाठलाग करुन झालेल्या या मारहाणीत बुलेटधारक तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील सर्व संशयीत आरोपींना न्यायालयीन कोठडीत जाण्याची आणि कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली.
अमळनेर या गावी विकास प्रविण पाटील हा बांधकाम ठेकेदार तरुण रहात होता. बांधकाम व्यवसायानिमीत्त फिरण्यासाठी त्याच्याकडे बुलेट हे अवजड आणि रुबाबदार दुचाकी वाहन होते. विकासचा भाऊ विठ्ठल पाटील हा लेबर कॉन्ट्र्क्टर होता. रोजंदारीने मजुर पुरवण्याचे तो काम करत होता. एकत्र कुटूंबात दोघे भाऊ रहात होते.
ग्रामीण भागातील जनतेच्या मनात यात्रेला जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. यात्रेत जावून तमाशा बघणे हा ग्रामीण जनतेसाठी एक आगळ्यावेगळ्या आकर्षणाचा विषय असतो. अमळनेर तालुक्यातील पिंगळेवाडे या गावची यात्रा होती. या यात्रेला विकास आणि त्याचा मित्र अजित पाटील असे दोघे जण बुलेटने 2 नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेच्या सुमारास बुलेटने निघाले होते. विकासचा भाऊ विठ्ठल आणि शेजारी राहणारा बापू महाजन असे दोघेही यात्रा बघण्यासाठी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलने निघाले होते. दोघे भाऊ आपआपल्या मित्रांसमवेत यात्रेचा आनंद लुटण्यासाठी पिंगळेवाडे गावाच्या दिशेने जात होते.
विकास पाटील हा त्याच्या बुलेटवर जात असतांना वाटेत स्विफ्ट डिझायर कार देखील मार्गक्रमण करत होती. अमोल वासुदेव कोळी या कार चालकाने विकासच्या ताब्यातील बुलेटला जोरदार कट मारला. या घटनेत विकासच्या बुलेटचे साईड इंडीकेटर तुटले. साहजीकच बुलेटचे इंडीकेटर तुटल्यामुळे विकास कारचालक अमोल कोळी याच्यावर चिडला. मध्यरात्रीची वेळ आणि त्यात कारमधे एकुण आठ तरुण असल्यामुळे साहजीकच त्यांच्या अंगी तरुणाईचा जोश होता. आपल्या चुकीमुळे रस्त्यावरील बुलेटधारकाच्या बुलेटचे इंडीकेटर तुटले तरी कारमधील सर्वांचा मिजास भारी होता. आपल्या बुलेटचे नुकसान झाल्याने विकासचे चिडणे स्वाभाविक होते.
बुलेटचे नुकसान झाल्यामुळे विकासने कार थांबवून कारचालक अमोल कोळी यास जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र कारमधील आठ जणांचे बहुमत असतांना रस्त्यावर रात्रीच्या अंधारात बुलेटवरील विकास एक प्रकारे अल्पमतात होता. तरीदेखील त्याने हिम्मत करत कारमधील सर्वांना बुलेटच्या नुकसानीबद्दल जाब विचारला. विकास विरुद्ध कारमधील आठ जण यांच्यात शब्दामागे शब्द वाढत गेला. कारमधील सर्वजण आपल्या तो-यात विकासचे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. आपल्याच गावात येऊन आपल्यालाच रुबाब दाखवतो असे कारमधील सर्वांचे एकमत झाले होते.
2 नोव्हेंबरच्या त्या मध्यरात्री गांधली गावातील स्मशानभुमीनजीक विकास आणि कारमधील त्या सर्व आठ जाणांचा वाद मोठमोठ्याने सुरु होता. अमोल वासुदेव कोळी या मजुरी करणा-या कारचालकाला देखील इतरांच्या साथीने माज आला. अमोल कोळी याच्यासह नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, दिपक प्रल्हाद पवार, ऑटो चालक सुमित संतोष संदानशिव, नोकरदार असलेला मनोज हनुमंतराव श्रीगणेश, शिक्षकाची नोकरी करणारा कमलाकर हनुमंतराव श्रीगणेश, रोहीत सिताराम पाटील असे सर्वजण एकवटले.
यावेळी विकासचा भाऊ विठ्ठल हा देखील पिंगळेवाडे येथील यात्रा बघण्यासाठी शेजारी राहणा-या बापू महाजन याच्यासोबत मोटार सायकलने जात होता. वाटेत गांधली गावातील स्मशानभुमीजवळ विठ्ठल यास लोकांची गर्दी दिसली आणि मोठमोठ्याने आवाज ऐकू आला. त्या गर्दीजवळ विठ्ठल आला. त्या गर्दीत त्याला त्याचाच भाऊ विकास दिसला. विकासच्या अंगावर कारमधील तरुण धावून जात असल्याचे विठ्ठलने पाहिले. त्यामुळे तो लगबगीने भाऊ विकास जवळ आला.
विठ्ठलने त्याचा भाऊ विकासला हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली. त्यावर दम लागलेल्या विकासने विठ्ठल यास सांगितले की या गाडीवाल्याने माझ्या बुलेटला कट मारला. त्यामुळे गाडीचा इंडिकेटर तुटला आहे. तरी देखील हे लोक मला अरेरावी आणि धक्काबुक्की करत आहेत. आपल्या भावाचा जीव धोक्यात असल्याचे ओळखत विठ्ठल याने विकासला घटनास्थळावरुन तातडीने जाण्यास सांगितले. विठ्ठलचे म्हणणे ऐकून विकासने कसाबसा जीव वाचवत बुलेटसह अमळगावच्या दिशेने मार्गक्रमण केले. विकास निघून गेल्यानंतर विठ्ठलने गाडीतील सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने एकमेकांचा परिचय देखील करुन घेतला. एमएच 19 बीजे 4791 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर गाडीचा चालक अमोल वासुदेव कोळी, हा मजुरी करणारा होता. गाडीतील सर्वजण पिळोदा व गांधली येथील रहिवासी, शेतमजुरी करणारे तरुण होते. त्यापैकी कमलाकर हनुमंतराव श्रीगणेश हा शिक्षक होता. अमोल कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, दिपक प्रल्हाद पवार, सुमित संतोष संदानशिव, मनोज हनुमंतराव श्रीगणेश, कमलाकर हनुमंतराव श्रीगणेश, रोहीत सिताराम पाटील अशा आठ जणांची विठ्ठलने ओळख करुन घेतली.
आपली चुकी नसतांना देखील वेळ आणि प्रसंग बघून विठ्ठलने सर्वांची समजूत घालून कसाबसा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो अमळगाव येथे आला. विठ्ठल निघून गेल्यानंतर कारमधील सर्वांनी मोबाईलच्या माध्यमातून इतरांशी संपर्क साधत गावातील काही तरुणांना हातात लाठ्या काठ्या घेऊन बोलावून घेतले. विकासच्या मागेमागे त्याचा भाऊ विठ्ठल हा अमळगावला आला. त्याठिकाणी त्याचा भाऊ विकास हा घाबरलेल्या अवस्थेत थरथर कापत उभा होता. काही कळण्याच्या आत दहा ते पंधरा मिनिटांनी पुन्हा सर्वजण त्या स्विफ्ट कारने अमळगावला आले. त्यांच्या कारच्या मागे मागे मोटार सायकलवर काही तरुण देखील आले. मोटार सायकलवर डबलसिट बसलेल्या तरुणांच्या हातात लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड होता.
आता परिस्थिती गंभीर आणि जीवघेणी असल्याचे बघून विकास आणि विठ्ठल या दोघा भावांनी सर्वांना हात जोडून विनंती केली की आमची चूक झाली असल्यास आम्ही माफी मागतो. त्याचवेळी हल्लेखोरांचा जमाव बघून गावातील लोक देखील जमा झाले. आलेल्या गावक-यांनी देखील हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारमधील सर्वांसह त्यांच्या साथीदारांनी विकासला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विठ्ठलने पुन्हा एकवेळा विकासला त्यांच्या तावडीतून बुलेट घेऊन पळून जाण्यास सांगितले. हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी विकासने बुलेटने जळोद गावाच्या दिशेने पलायन केले. मात्र त्याचा स्विफ्टसह मोटार सायकलीवरील तरुणांनी पाठलाग सुरु केला. आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी विठ्ठलने त्याचा मित्र अजीत पाटील याच्यासह पाठलाग सुरु केला.
काही अंतर पाठलाग केल्यानंतर स्विफ्ट कार चालक अमोल कोळी याने बुलेटवरील विकास पाटील यास धडक दिली. या धडकेत विकास बुलेटसह जमीनीवर कोसळला. विकास खाली पडताच मोटार सायकलवरील तरुणांनी लाठ्या काठ्या व रॉडने विकासच्या डोक्यावर आणि चेह-यावर जबर मारहाण सुरु केली.
विकास जखमी अवस्थेत अत्यवस्थ असल्याचे बघून सर्व हल्लेखोर तेथून पळून गेले. आपल्या भावाला रक्ताच्या थारोळ्यात बघून विठ्ठल पुढे सरसावला. अजित पाटील या मित्राच्या मदतीने विठ्ठलने जखमी विकासला उचलले. त्याला दुचाकीच्या सिटवर मधोमध बसवून दोघांनी अमळगाव येथील दवाखान्यात उपचारासाठी आणले.
मात्र विकासची अवस्था गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अमळनेर येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले. याठिकाणी थोडावेळ उपचार केल्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.
अशा प्रकारे मृत्युशी झुंज देण्यात विकास अपयशी ठरला. ती रात्र त्याच्यासाठी काळरात्र ठरली. केवळ बुलेटचे इंडीकेटर तुटल्याच्या वादातून त्याचा जीव गेला. तरुणाईचा जोश आणि त्यातून सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याचा जीव घेण्यात आला.
या घटनेप्रकरणी मयत विकासचा भाऊ विठ्ठल पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.न. 154/2024 भारतीय न्याय संहीता 103 (1), 352, 351 (1), 189 (1), 191 (1), 191(3), 190, 3(5), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 237 (1)(3) चे 135 हा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास मारवड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील व त्यांचे सहकारी हे.कॉ. सुनील अगोणे व मुकेश साळुंखे आदींनी सुरु केला. तसेच समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड व त्यांच्या सहका-यांनी देखील सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रीक मदतीच्या सहाय्याने अमोल वासुदेव कोळी नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव या तिघांना जामनेर तालुक्यातील नेरी या गावातून कमलाकर हनुमंत श्रीगणेश यास पाचोरा येथून व रोहित सिताराम पाटील व मनोज हनुमंत श्रीगणेश या दोघांना अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अटकेतील संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सुरुवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सध्या सर्व संशयीत आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेचा पुढील तपास मारवड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करत आहेत.
पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, हे.कॉ. संदिप पाटील, लक्ष्मण पाटील, दिपक माळी, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, रविंद्र पाटील, भगवान पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, राहुल महाजन, जितेंद्र पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, भारत पाटील आदींनी केला.