नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या जायखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि जायखेडा पोलिस स्टेशन या दोघांच्या अथक परिश्रमातून हा गुन्हा उघडकीस आला आहे. जमीनीच्या वादातून हा दुहेरी खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पाच संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांनी खूनाची कबुली दिली आहे.
दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी जायखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील साल्हेर किल्ल्याच्या डोंगरावर दोघा पुरुषांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले होते. मयत अज्ञात इसमांनी परिधान केलेले कपडे आणि घटनास्थळावर मिळून आलेल्या चिज वस्तूंच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात पोलिस पथकाला यश आले. कळवण तालुक्यातील रामभाऊ गोटीराम वाघ आणि नरेश रंगनाथ पवार अशी दोघांची नावे निष्पन्न झाली. दोघा मयतांच्या डोक्यावर, चेह-यावर व मानेवर कुणीतरी अज्ञातांनी घातक हत्याराने प्राणघातक हल्ला करत जीवे ठार केले होते. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह निर्जन डोंगरावर आणून टाकण्यात आले होते.
या घटनेप्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनला गु.र.न. 500/2024 भा.न्या.सं. कलम 103, 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासाअंती दोघे मयत बेपत्ता असल्याची नोंद 13 नोव्हेंबर रोजी अभोणा पोलिस स्टेशनला आढळून आली होती. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे आणि जायखेडा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. पुरुषोत्तम शिरसाठ आदींनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. या घटनेतील दोघे मयत 13 नोव्हेंबर रोजी कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटार सायकलने गेल्याची माहिती समजली. त्या माहितीच्या आधारे संशयीतांची नावे निष्पन्न करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा आणि जायखेडा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सतत दोन दिवस साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवली. अखेरीस विश्वास दामु देशमुख (रा. केळझर, ता. सटाणा, जि. नाशिक), तानाजी आनंदा पवार (रा. खालप, ता. देवळा, जि. नाशिक), शरद उर्फ बारकु दुगाजी गांगुर्डे (रा. बागडु, ता. कळवण, जि. नाशिक), सोमनाथ गोटीराम वाघ (रा. गोपाळवडी, ता. कळवण, जि. नाशिक), गोपीनाय सोमनाथ वाघ (रा. गोपाळवडी, ता. कळवण) अशा पाच संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. या पाचही जणांची सखोल चौकशी केली असता त्यांनी खूनाचा गुन्हा कबुल केला.
संशयीत सोमनाथ गोटीराम वाघ व मयत रामभाऊ गोटीराम वाघ यांच्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद होता. मयत रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार हा या वादात त्याला कळवण न्यायालयात मदत करत होता. त्याचा राग संशयीत सोमनाथ गोटीराम वाघ याच्या मनात होता. त्यातून त्याने इतर संशयीतांची जमवाजमव करुन दोघा मयतांना साल्हेर किल्ल्यावर धनाचा साठा असल्याचे सांगून बोलावले. साल्हेर किल्ल्यावर रामभाऊ गोटीराम वाघ आणि नरेश रंगनाथ पवार असे दोघे जण धनाच्या लालसेने येताच पाचही जणांनी काठी, कु-हाड व दगडाने त्यांच्या डोक्यावर, मानेवर व अंगावर निघृण मारहाण केली. या निघृण मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांचे मृतदेह निर्जनस्थळी साल्हेर पठारावरील निर्जन स्थळी सोडून देण्यात आले. त्यानंतर दोघा मयतांच्या मोटार सायकलींची विल्हेवाट देखील लावण्यात आली.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक (मालेगाव) अनिकेत भारती, मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आदींनी हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, पोउनि दत्ता कांभीरे, जायखेडा पो.स्टे. चे सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ, स्थागुशाचे सहायक फौजदार नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हे.कॉ. गिरीष निकुंभ, शरद मोगल, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, संदिप नागपुरे, सतिष जगताप, किशोर खराटे, हेमंत गरूड, पोना नवनाथ वाघमोडे, सुभाष चोपड़ा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, विनोद टिळे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोहेकॉ. हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, जायखेडा पो. स्टे.चे पोलिस उप निरीक्षक चेडे, पोना जाधव, क्षिरसागर, वनसे, बारगळ आदींच्या पथकाने या दुहेरी खूनाच्या तपासकामी सहभाग घेतला.