जळगाव : तिन जीवंत काडतुस आणि तिन गावठी कट्ट्यासह खुलेआम दहशत माजवणा-या तिघा सराईत गुन्हेगारांना रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. कल्पेश (प्रबुध्द) गुलाब सपकाळे (रा.न्यु पिंप्राळा हुडको, दुध फेडरेशन जळगांव, गौरव समाधान सोनवणे (रा. गॅलेक्सी कॉलनी, गुजराल पेट्रोल पंपाच्यामागे जळगांव) आणि लिलाधर देवीदास कोळी (रा. हिराशिवा कॉलनी खोटे नगर जळगांव) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
रामानंद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र गुंजाळ यांना समजलेल्या माहितीच्या आधारे तिघा सराईत गुन्हेगारांना तिन गावठी कट्ट्यासह पिंप्राळा हुडको परिसरातून संशयास्पदरित्या फिरत असतांना जेरबंद करण्यात पोलिस पथकाला यश आले. या तिघांविरुद्ध या पुर्वी देखील विविध स्वरुपाचे गुन्हे पोलिस दप्तरी दाखल आहेत. त्यांच्या ताब्यातून 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.
प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सफौ संजय सपकाळे, हे.कॉ. इरफान मलिक, पोहेकॉ. सुशिल चौधरी, जितेंद्र राजपुत्, जितेंद्र राठोड, पोना हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, पो.नाईक विनोद सुर्यवंशी, पोकॉ. रविद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.