क्रिकेटचा वाद आणि मुकादम होण्याचा नाद —– टोळी हल्ल्यात सिद्धार्थ झाला कायमचा बाद

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): “छल मे बहुत बल है लेकीन माफी ही अंतिम हल है” अशी हिंदीत एक म्हण आहे. पुर्ववैमनस्यातून एखाद्याचा छ्ळ करणे, वर्षानुवर्ष एखाद्या व्यक्तीविषयी मनात राग ठेवणे, बदल्याची भावना ठेवणे हा प्रकार आणि स्वभाव मनुष्याला घातक ठरतो. वेळेनुसार स्वत:मधे बदल करुन घेणे हीच काळाची गरज असते. वर्षानुवर्ष दोन गटातील द्वेषभावना कधीतरी एखाद्या मोठ्या गुन्ह्यात परावर्तीत होते. एकदा का मनुष्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला म्हणजे पोलिस स्टेशनच्या, न्यायालयाच्या पाय-या चढणे, जेलमधे जाणे हे प्रकार ओघाने येतात. झाले गेले विसरुन पुढेपुढे जावे हे म्हणायला फार सोपे असते. मात्र ख-या खु-या जीवनातील वास्तव काहीसे वेगळे असते. क्रिकेट खेळण्यावरुन झालेला वाद आणि रेल्वे मालधक्क्यावरील टोळी मुकादम होण्यास अडथळा आणल्याचा गैरसमज या दोन कारणामुळे दोन गटात गेल्या तिन वर्षापासून वैमनस्य होते. या जुन्या वादातून विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरात टोळी युद्धाचा भडका उडाला. या टोळी युद्धात एकाचा जीव गेला तर काहीजण जखमी झाले.

mayat siddarth wankhede

जळगाव शहरातील विकास दुध फेडरेशन परिसरात राजमालती नगर आहे. या ठिकाणी राजु बिस्मिल्ला पटेल हा  माजी नगरसेवक परिवारासह राहण्यास आहे. माजी नगरसेवक राजु पटेल हा रेल्वे मालधक्क्यावरील टोळी क्रमांक 35 चा मुकादम आहे. राजु पटेल हा रहात असलेल्या राजमालती नगरातच संजु पटेल आणि मेहमुद पटेल हे त्याचे दोघे भाऊ त्यांच्या परिवारासह राहतात. रेहान उर्फ जानू हा संजू पटेलचा मुलगा आणि राजूचा पुतण्या आहे.

राजु पटेल मुकादम असलेल्या रेल्वे मालधक्क्यावर टोळी क्रमांक आठचा मुकादम राजु उर्फ जॉन्टी मना हटकर हा आहे. मधुबाबा पवार हा टोळी क्रमांक आठचा पुर्वी मुकादम होता. मात्र वय झाल्याने तो या टोळीच्या मुकादम पदापासून दुर झाला. त्यानंतर त्याचे निधन झाले. त्यामुळे या मुकादम पदावर राजु हटकर याची वर्णी लागली. आठ क्रमांकाच्या टोळीत विशाल अजय सुरवाडे हा मजुर आहे. मजुर असलेला विशाल सुरवाडे हा या टोळीचा मुकादम होण्यास इच्छुक होता असे म्हटले जाते. मात्र टोळी क्रमांक आठचा मुकादम म्हणून राजू  हटकर याची नेमणूक झाली. राजू हटकर यास मुकादम होण्याकामी राजू पटेल याने मदत केली असा विशाल सुरवाडे याचा समज होता. माजी नगरसेवक राजु पटेल याने राजु हटकर याला मुकादम होण्यास मदत  केली नसती तर त्याजागी आपली नियुक्ती झाली असती असा देखील विशाल सुरवाडे याने मनाशी समज केला होता. राजुने आपल्याला हेतू पुरस्सर मुकादम होऊ दिले नाही या समजातून विशालच्या मनात राजुविषयी होता.

संजु पटेल हा राजू पटेल याचा लहान भाऊ आहे. रेहान उर्फ जानू हा संजुचा मुलगा आहे. विशाल सुरवाडे आणि रेहान या दोघांचा सन 2021 मधे क्रिकेट खेळण्यावरुन वाद झाला होता. रेहान याने विशाल यास क्रिकेटच्या खेळात सहभागी केले नव्हते. त्यामुळे विशालचा रेहानवर राग होता. अशा प्रकारे विशालचा राजू आणि त्याचा पुतण्या रेहान या दोघा काका पुतण्यांवर क्रिकेट आणि मुकादम पद या विषयी राग होता.

क्रिकेटच्या वादातून त्यावेळी विशालने रेहानला मारहाण केली होती. हा मारहाणीचा वाद तेव्हा थेट पोलिस स्टेशनपर्यंत गेला होता. विशाल सुरवाडे याचा मेहुणा सिद्धार्थ माणीक वानखेडे याने संबंधितांविरुद्ध जळगाव शहर  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. राजुचा भाऊ संजु याने देखील त्यावेळी मारहाणीची परस्परविरोधी गुन्हा जळगाव शहर  पोलिस स्टेशनला दाखल केला होता. तेव्हापासून राजु, त्याचा पुतण्या रेहान उर्फ जानू आणि राजुचे दोघे भाऊ  संजु आणि मेहमुद असे सर्वजण सिद्धार्थचा तिरस्कार करत होते. दोन गटात तेव्हापासून वादाची धुसफुस सुरुच होती. दोन्ही गट समोरासमोर आले म्हणजे एकमेकांना बघून घेण्याची भाषा करत होते.

अखेर 20 नोव्हेंबर 2024 हा सिद्धार्थच्या जीवनातील अखेरचा काळा दिवस उजाडला. तिन वर्षापुर्वी पटेल समुहाविरुद्ध गुन्हा दाखल करणारा विशालचा मेहुणा सिद्धार्थ वानखेडे याच्या जीवनातील हा अखेरचा दिवस होता. या दिवशी त्याच्या हातून विधानसभा आमदार निवडीसाठी मतदान करण्याचे एक महत्वाचे कार्य नियतीने बाकी ठेवले होते. मतदान केल्यानंतर त्याच्या पुढ्यात नियतीने त्याचे मरणच ठेवले होते. या दिवशी सकाळी लवकर उठून सिद्धार्थने मतदानाला जाण्याची तयारी केली. सकाळच्या वेळी सिद्धार्थने एसएमआयटी महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचे काम केले. त्यानंतर घरी परत येतांना वाटेत सुरत रेल्वे गेटनजीक त्याची राजु पटेल सह त्याचा मुलगा फैजान, पुतण्या रेहान, भाऊ मेहमुद बिस्मिल्ला पटेल आणि आवेश पटेल या सर्वांसोबत नजरानजर झाली.

यावेळी सिद्धार्थ आणि राजु पटेल याच्यासह त्याच्या साथीदारांमधे सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत होण्यास अजिबात वेळ लागला नाही.  राजु पटेल, मेहमुद पटेल व जस्मिन पटेल या तिघांच्या हातात लाकडी दांडा तर आवेश पटेल व संजु पटेल या दोघांच्या हातात लोखंडी चॉपर होता. परिस्थिती अजून गंभीर आणि हल्ला प्राणघातक होणार असल्याचे लक्षात येताच सिद्धार्थ याने त्याचा शालक विशाल सुरवाडे याला बोलावून घेतले. आपल्या मेहुण्यावर पटेल टोळीकडून प्राणघातक हल्ला होत असल्याचे समजताच विशाल सुरवाडे हा देखील त्याच्या साथीदारांसह घटनास्थळी धावून गेला.

यावेळी विशाल सुरवाडे याच्यासोबत आलेल्या साथीदारांकडे लाकडी दांडे, लाकडी पट्टी, लाकडी बल्ली, चाकु, लोटगाडीचा दांडा, दगड, विटा व लोखंडी सळई अशी हत्यारे होती. विशाल सुरवाडे घटनास्थळी येताच त्याला राजु पटेल व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ सुरु केली. पुढच्याच क्षणी जस्मिन आणि रेहान या दोघांनी सिद्धार्थचे हात पकडले. त्यावेळी आवेश पटेल याने सिद्धार्थला उद्देशुन म्हटले की “इसका बायपास हुवा है,  इसके छातीपे मारो”.  त्यावेळी आवेश, मेहमुद, संजु, या तिघांनी सिद्धार्थला लाकडी दांड्याने कृरपणे मारहाण सुरु केली. जखमी मेहुणा सिद्धार्थ जमीनीवर पडल्यानंतर त्याला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवण्यासाठी विशाल गेला असता त्याला देखील मेहमुद व रेहान या दोघांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने डोक्यावर, हातावर आणि खांद्यावर मारहाण केली. या मारहाणीत विशाल हा देखील जखमी झाला. काही वेळासाठी या घटनास्थळाला रणभुमीचे स्वरुप आले. सिद्धार्थ याच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. तरीदेखील त्याला जबर मारहाण करुन हल्लेखोर पळून गेले. जखमी सिद्धार्थला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यापुर्वीच मृत्यूने गाठले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मतदान बंदोबस्तवरील पोलिस अधिका-यांसह कर्मचा-यांना घटनास्थळी रवाना केले. या घटनेप्रकरणी जळगाव शहर  पोलिस स्टेशनला जखमी राजु पटेल आणि विशाल सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

जखमी राजु पटेल याच्या फिर्यादीनुसार त्याचा मुलगा फैजान पटेल याला राजु सुरवाडे , दिनेश माने, अजय सुरवाडे, प्रेम सुरवाडे , भुषण राजन, विशाल सुरवाडे यांनी हातातील हत्याराने मारहाण केली. त्यामुळे फैजान याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताला मुका मार लागला आणि त्याच्या डोक्याच्या कवटीला फॅक्चर होवुन मेंदूत रक्तस्त्राव झाला. शासकीय रुग्णालयात उपचारानंतर त्याला पुढील उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

राजु पटेल याने दिलेल्या फिर्यादीत नमुद केल्याप्रमाणे त्याचा पुतण्या रेहान उर्फ जानु संजु पटेल याला विशाल सुरवाडे, विक्की माने, दिनेश माने, मंगेश काजवे, रवि जंजाळे यांनी त्यांच्या हातातील हत्याराने मारहाण केल्याने त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर देखील सुरुवातीला शासकीय रुग्णालयात व नंतर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. याच फिर्यादीत राजु पटेल याने म्हटल्याप्रमाणे त्याचा भाऊ मेहमुद बिस्मिल्ला पटेल याला विशाल सुरवाडे, सिध्दार्थ वानखेडे, दिनेश माने, अजय सुरवाडेचा भाचा यांनी हातातील हत्याराने मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दोन्ही हातांवर खरचटले. याप्रकरणी राजु पटेल याने दिलेल्या फिर्यादीनुसार 513/24 या क्रमांकाने प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक महेश घायतड यांच्याकडे देण्यात आला.

या व्यतिरिक्त विशाल सुरवाडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर  पोलिस स्टेशनला गु.र.नं. 511/24 भारतीय न्याय संहिता 191 (2), 191 (3), 190, 109, 103 (1), 352, अनुसुचित जातीआणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 19891(आर), 3(1) (यु), 3(2) (व्हिए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी राजु बिस्मिल्ला पटेल, संजु पटेल, मेहमुद पटेल, आवेश पटेल, जस्मीन पटेल, जानु उर्फ रेहान पटेल अशा सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी संदिप गावीत यांनी सुरु केला.

मयत  सिद्धार्थ वानखेडे याच्यासह इतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले त्यावेळी परिस्थिती गंभीर झाली होती. यावेळी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांसह राजमालती नगर  परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप गावीत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन  आव्हाड, जळगाव शहरातील विविध पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आदी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दाखल होते. या घटनेला कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसून मतदानाशी या घटनेचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या घटनेला अनुसरुन काही जणांनी दगडफेक व इतर  साहित्य ढकलून देत नुकसान केले. हा सर्व प्रकार सिसीटीव्हीत कैद झाला. या घटनेप्रकरणी मारहाण करणा-यांना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईकांनी शहर पोलिस स्टेशनला ठिय्या आंदोलन व मोठ्या प्रमाणात आक्रोश देखील केला. पोलिसांनी शोकमग्न नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर नातेवाईक परतले.

दुस-या दिवशी देखील शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तणावाची परिस्थिती होती. त्यामुळे 27 तासांनी शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका मयत सिद्धार्थच्या नातेवाईकांनी घेतली. मात्र पोलिसांनी संयमाने प्रकरण हाताळण्याचे कौशल्य पणाला लावले. शव  विच्छेदन आटोपल्यानंतर सिद्धार्थचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सुरुवातीला संशयीत आरोपी माजी नगरसेवक राजु पटेल व त्याचा भाऊ  संजु पटेल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर क्रमाक्रमाने मेहमुद बिस्मिल्ला पटेल व रेहान उर्फ जानू संजु पटेल या दोघांना देखील ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई पुर्ण करण्यात आली. तपास अधिकारी पोलिस उप अधिक्षक संदीप गवीत यांनी अटकेतील दोघांची गुन्हेगारी पार्श्वभुमी न्यायालयासमक्ष कथन  केली. मेहमुद पटेल याच्याविरुद्ध चार तर रेहान उर्फ जानू पटेल याच्याविरुद्ध दोन गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. न्या. बावरे यांनी दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप महाजन यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या घटनेचा पुढील तपास डीवायएसपी संदीप गावीत व त्यांचे सहकारी  पोलिस निरीक्षक अनिल भवारी, हे.कॉ. विकास महाजन, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड, पोलिस उप निरीक्षक महेश घायतड आदी करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here