जळगाव : जनता, शासकीय कर्मचारी आणि सुत्रांकडून मिळालेल्या मौखिक माहितीच्या आधारे आपल्या जीवीतास धोका आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची तक्रार जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी इ मेलच्या माध्यमातून शासन दरबारी वरिष्ठ पातळीवर केली आहे. जळगाव जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिका-यांपासून आपणास हा धोका असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.
सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातून आपण शासन दरबारी पाठपुरावा करत असतो. मात्र त्यामुळे काही भ्रष्ट अधिकारी दुखावले जातात. व त्यातूनच हा प्रयत्न होत असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. यापुर्वी अनेकवेळा आपणास जीवे मारण्यासह खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचे गुप्ता यांनी राज्यपाल, राज्याचे मुख्य सचिव, पंतप्रधान आदी कार्यालयांना मेल च्या माध्यमातून केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. याबाबत आपण पोलिस दप्तरी वेळोवेळी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. आपले पोलिस सरंक्षण काढून घेतल्यास आपल्या जीवाचे बरे वाईट होऊ शकते असे देखील गुप्ता यांनी म्हटले आहे.