जळगाव : धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील तलाठी दत्तात्रय शांताराम पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जखमी करणा-या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. हल्लेखोर चौघांपैकी प्रत्येकी दोघांना जळगाव शहरातून तर उर्वरीत दोघांना धरणगाव तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला नायब तहसीलदार संदीप विजयसिंग मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तलाठी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या घटनेची गांभिर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेत आबा इश्वर कोळी, योगेश इश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी या चोघा हल्लेखोरांना अटक केली.
अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध करण्याकामी तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकामधे तलाठी दत्तात्रय शांताराम पाटील यांचा समावेश करण्यात आला होता. चांदसर येथील स्मशानभुमी कडील स्त्याने गिरणा नदीच्या पात्रात हे पथक अवैध वाळू वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी 19 डिसेंबर रोजी गेले असता दत्तात्रय पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला.
चांदसर येथील योगेश ईश्वर कोळी व आबा ईश्वर कोळी यांनी त्यांच्या हातातील वाळु भरण्याच्या फावड्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या डोक्यावर जिवघेणा हल्ला केला. तो हल्ला पाटील यांनी कसाबसा चुकवला. मात्र लगेचच त्यांच्या उजव्या पायाचे पोटरीजवळ नळीवर फावड्याने मारहाण करुन त्यांचा पाय मोडला. दिनेश सोमा कोळी व गणेश सोमा कोळी तसेच काही मजुरांनी मिळून संघटीतपणे तलाठी पाटील यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी पोटावर मारहाण करत हल्ला केला. त्यानंतर सर्वजण अवैध वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरसह पळून जाण्यात यशस्वी झाले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच अवैध वाळूने भरलेल्या ट्रक्टरसह पळून गेल्याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पाळधी दुरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांचे सहकारी करत होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा देखील करत होती.
अहोरात्र तपास करत फरार चोघा हल्लेखोरांना ट्र्क्टरसह अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड, पाळधी दुरक्षेत्राचे स.पो.नि. प्रशांत कंडारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरिक्षक दत्तात्रय पोटे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, विजय पाटील, हरीलाल पाटील, पो.कॉ. सोमवंशी मेजर आदींनी या कारवाईसह तपासकामी सहभाग घेतला. स. पो. नि. प्रशांत कंडारे यांनी हल्लेखोरांना आज न्यायालयात हजर केले असा न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.