नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी – अजित जैन

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –  जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष  भवरलाल जैन ऊर्फ मोठेभाऊ यांच्या जयंतीनिमित्त १४ डिसेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या काळात जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास पन्नास प्रकारची पीके उभी करण्यात आली आहेत. ही पीके पाहण्यासाठी देश व राज्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून या कृषी महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी केले आहे.

अजित जैन पुढे म्हणाले की, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) व हवामान बदल (क्लायमेंट चेंज) या दोन समस्यांचा शेतकऱ्यांना आता वारंवार सामना करावा लागतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही होत आहे. हे नुकसान कसे टाळावे आणि त्यासाठी उत्पादन पद्धती बदल करून कोणती नवीन तंत्रे वापरावीत या संबंधीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे म्हणून आधुनिक पद्धतीने पीके उभी केली आहेत. ती शेतकऱ्यांना समक्ष पाहता येतील. ‘बघितले की विश्वास बसतो’ असे म्हणतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात उभी असलेली ही पीके स्वत: पाहणे गरजेचे आहे.

कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कांद्यामध्ये केळी बागेची उभारणी, गादीवाफ्यावर आधाराने व बिन आधाराची कागोमी जातीच्या टोमॅटोची लागवड, मिरची, पपई यांची सीडलिंग लावून केलेली लागवड, हळदीचे पीक, ठिबकवर गहू, भात यांची लागवड, उसाला वरून मॉड्यूलर स्प्रिंकलरद्वारे पाणी, सौर पंपांच्या सहाय्याने पिकांना सिंचन, पॉलिहाऊस मधील बंदिस्त व नियंत्रित वातावरणात केळी, आंबा, संत्री, मोसंबी या फळझाडांची लागवड, सघन व अतिसघन पद्धतीने उभ्या केलेल्या फळबागा (उदा सीताफळ, पेरू, चिकू, आंबा, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज वगैरे) या बरोबरच गादीवाफा, मल्चिंग, डबल लॅटरल, फर्टिगेशन ही सर्व तंत्रे शेतकऱ्यांना येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कृषी महोत्सवासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नसून शेतकऱ्यांना ते मोफत पाहता येईल. तसेच टिश्यूकल्चर व अन्य तंत्राद्वारे तयार केलेली उत्कृष्ट दर्जेदार व रोगमुक्त रोपेही शेतकऱ्यांना पाहता येतील असेही अजित जैन यांनी सांगितले. तेव्हा अधिकाधिक शतेकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन महोत्सवाला सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत भेट द्यावी ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here