जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : खाकी वर्दीधारी पोलिस हे अनेकदा विविध कारणांमुळे टीकेचे धनी होत असतात. आपल्यावर टीका होणार नाही याची पुरेपुर काळजी घेणारे पोलिस अधिकारी आणी कर्मचारी पोलिस दलात कार्यरत असतात. अंगावर खाकी वर्दी असतांना फार काळजीपुर्वक वर्तन करावे लागते. खाकी वर्दी अंगावर घालून नकली पोलिसांनी बनावट कारवाई केल्याच्या घटना आपण ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. मात्र अंगावर वर्दी घालून असली पोलिस केवळ काही रुपयांसाठी फसव्या कारवाईचा बनाव करतात हे जळगाव शहरातील एका घटनेतून उघडकीस आले आहे.
मुख्यालयी नोकरी करणा-या पोलिसांवर तपासकामाची जबाबदारी नसते. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा फारसा लोड नसतो. ते परिवारासाठी पुरेसा वेळ देऊ शकतात. पोलिस मग तो पोलिस स्टेशनला काम करणारा असो नाही तर मुख्यालयी काम करणारा असो, त्याला पोलिस दलातील खाचखळगे माहिती असतात. वेळेची मुबलकता असणारे मुख्यालयी काम करणारे काही पोलिसकर्मी कित्येकदा कायद्याच्या पलीकडे जाऊन आगळी वेगळी डेअरिंग करतात असे लोक म्हणतात.
जळगाव पोलिस दलात योगेश शेळके नावाचा पोलिस नाईक मुख्यालय कर्मचारी म्हणून नेमणूकीस होता. आजारपणाच्या नावाखाली तो गेल्या कित्येक दिवसांपासून मुख्यालयी नेमणूकीला होता असे म्हटले जाते. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी सचिन सुनिल धुमाळ नावाचा तरुण हा पोलिसकर्मी योगेश शेळके याचा परिचीत होता. दोघे एकमेकांना परिचीत होते. एखाद्याची लुबाडणूक करण्याच्या बाबतीत दोघे समविचारी होते असे म्हणावे लागेल. सचिन धुमाळ याने योगेश शेळके याच्याकडून त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी काही रक्कम उधार घेतली होती असे समजते. त्यामुळे दोघे एकमेकांचे चांगल्याप्रकारे मित्र होते असे म्हणण्यास वाव आहे. लबाडी हा घटक दोघांमधे समान होता असे देखील काही लोक म्हणतात.
एक लाख रुपयांचे तिन लाख करुन मिळतील असे जवळच्या परिचितांना सांगून व भासवून फसवणूकीचा फंडा वापरण्याचा दोघांनी ठरवले. त्या दृष्टीने शेळकेच्या मार्गदर्शनाखाली सावज हेरण्याचे काम सचिन धुमाळ करत होता. सचिन धुमाळ हा क्रिकेट खेळाडू होता. सन 2023 मधे जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर क्रिकेटचा सामना भरला होता. या सामन्यात सचिन धुमाळ खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. याच सामन्यात विकास मच्छिंद्र पाटील हा तरुण देखील सहभागी झाला होता. एकाच सामन्यात विकास पाटील आणी सचिन धुमाळ हे दोघे खेळाडू सहभागी झाले होते. पाचोरा येथील रहिवासी असलेला विकास पाटील हा त्याच तालुक्यातील खडकदेवळा या गावचा ग्रामसेवक म्हणून नेमणूकीला होता. एकाच सामन्यात सचिन धुमाळ आणि विकास पाटील हे दोघे सहभागी झाले होते. त्यामुळे दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. दोघांच्या ओळखीचे रुपांतर एकमेकांच्या मैत्रीत झाले.
लबाडाच्या नादी लागले म्हणजे तो आपल्याला गुलाम केल्याशिवाय रहात नाही ही आजच्या दुनियेची रित आहे. लबाड सचिन धुमाळच्या नादी विकास पाटील लागला. सचिन धुमाळ याने संपर्कासाठी विकास पाटील याला त्याचे दोन मोबाईल क्रमांक दिले. विकास पाटील याने देखील त्याचा मोबाईल क्रमांक सचिन धुमाळ याला दिला. अशाप्रकारे दोघे एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. एके दिवशी सचिन धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यास देवदर्शनासाठी राजस्थान येथे सोबत येण्याची गळ घातली. सचिनच्या वारंवार आग्रहामुळे विकास पाटील त्याच्यासोबत 2 डिसेंबर रोजी देवदर्शनासाठी खाटु शाम राजस्थान येथे गेला. विकास पाटील हा सहज आणि अलगद जाळ्यात सापडणारा सॉफ्ट टार्गेट मासा असल्याचे सचिन धुमाळ याने हेरले होते.
राजस्थान येथे हॉटेलमधील मुक्कामा दरम्यान सचिन धुमाळ याने विकास पाटील याच्यावर त्याचे मतलबी जाळे फेकण्यास सुरुवात केली. सचिन याने मुद्द्यावर येत विकासला म्हटले की माझ्याकडे अशी माणसे आहेत की ज्यांना एक कोटी रुपये दिले म्हणजे ते त्या एक कोटीच्या बदल्यात तिन कोटी अर्थात तिप्पट रक्कम देतात. मात्र तिप्पट रकमेच्या त्या सर्व नोटा एकाच सिरीजच्या असतात. सुरुवातीला विकासला त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. असा कोणता मुर्ख आहे की जो एक कोटीच्या बदल्यात तिन कोटी देतो असे म्हणत विकासने सचिनला विचारणा केली. मात्र सचिन हा विकासच्या मागेच पडला. तो विकासला म्हणाला की तु माझा जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला तुझ्या फायद्याची गोष्ट सांगतो. हवे तर अर्धे पैसे मी टाकतो. आपण दोघे मिळून तिप्पट पैसे करुन घेऊ. त्याच्या गोड बोलण्यावर आणि आमिषाला विकास भुलू लागला. अखेर विकासने सचिनच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. विकासने पैशाच्या लोभात पडून सचिनच्या योजनेवर पैसे गुंतवण्यास होकार दिला. अशा प्रकारे राजस्थान मुक्कामात सचिनने फेकलेल्या जाळ्यात विकास अडकला होता. मी पाचोरा येथे घरी गेल्यावर पैसे जमा करून तुला देतो असे विकासने सचिनला आश्वासन दिले. त्यानंतर दोघे जण आपापल्या घरी परतले.
घरी परत आल्यानंतर काही दिवसांनी सचिनने विकाससोबत संपर्क साधण्यस सुरुवात केली. तुझे पैसे जमा झाले का? अशी सचिन त्याला वारंवार विचारणा करु लागला. ही संधी सोडू नको, अशी संधी वारंवार येत नाही असे भावनिक आवाहन देखील तो विकासला करु लागला. त्यामुळे विकास अजूनच मोहात पडू लागला. सचिन आपल्याला खरोखरच पैसे तिप्पट करुन देईल असा विकासला विश्वास वाटू लागला. अखेर विकासने पैसे जमवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. विकासकडे घरात दोन लाख रुपये पडलेले होते. अजून मोठी रक्कम जमा करण्यासाठी तो कामाला लागला. त्याने जळगाव येथे सरकारी नोकरांसाठी असलेल्या सोसायटीच्या पतपेढीत जाऊन चौदा लाख रुपये कर्जाने घेतली. अशा प्रकारे त्याच्याकडे आता एकुण सोळा लाख रुपये जमले होते.
16 डिसेंबर 2024 रोजी सचिनने पुन्हा विकाससोबत मोबाईलवर संपर्क साधत पैशांची व्यवस्था झाली का अशी विचारणा केली. त्यावर विकासने आपल्याकडे सोळा लाख रुपये जमा झाल्याचे सचिनला सांगितले. त्यावर सचिनने त्याला म्हटले की माझ्याकडे आता विस लाख रुपये जमा झाले आहेत. तु चार वाजता जळगावला ये. आपण आपले सर्व पैसे आजच तिप्पट करुन घेऊ. सचिनच्या बोलण्यावर विश्वास ठेवत विकासने त्याच्या चारचाकी वाहनाने दुपारी जळगाव गाठले.
पैसे तिप्पट करुन घेण्याच्या लोभात पडून विकास सोळा लाख रुपयांची रोकड घेऊन पाचोरा येथून जळगावला जी.एस. मैदानानजीक आला. त्यावेळी त्याठिकाणी ठरल्यानुसार सचिन हा देखील त्याच्या मोटार सायकलने एक बॅग घेऊन आला. त्या बॅगेतील प्रत्येक गड्डीत केवळ खालच्या आणि वरच्या नोटा असली व आत नोटांच्या आकाराचे सर्व कोरे कागद होते. त्याने आपल्या बॅगेत विस लाख रुपये असल्याचा केवळ दिखावा केला होता.
या बॅग़ेत वीस लाख रुपये असल्याचे सांगून सचिनने ती बॅग विकासच्या गाडीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर सचिनने विकासला सांगितले की पैसे तिप्पट करुन देणारी व्यक्ती रेल्वे स्टेशनवर भेटणार आहे. तु तुझ्या कारने रेल्वे स्टेशनवर ये. अशा प्रकारे सचिन त्याच्या ताब्यातील मोटार सायकलने आणी विकास त्याच्या कारने रेल्वे स्टेशनला आला. दोघांनी आपापली वाहने रेल्वे स्टेशनला पार्क केली. आता मासा जाळ्यातून निसटू नये म्हणून विकास अजूनही त्याचे मन वळवत होता. आता आपण लवकरच करोडपती होणार आहोत, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही असे तो विकासला पटवून पटवून सांगत होता.
अखेर तिन तासांनी सव्वा सात वाजेच्या सुमारास पैसे तिप्पट करणारी व्यक्ती आली असल्याचे सचिनने विकासला सांगितले. ठरलेल्या प्लॅननुसार दोघे जण दोन्ही बॅगा घेऊन जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहावर गेले. त्यावेळी सचिन धुमाळ याने त्याचा तिप्पट पैसे देण्याचा बनाव करणारा नियोजीत साथीदार निलेश पंढरीनाथ अहिरे याला फोन केला. कुठे आहे अशी सचिनने त्याला मोबाईलवर विचारणा केली.
त्यानंतर सचिन हा विकासला रेल्वे स्टेशनच्या जिन्याजवळ लिफ्ट रुमजवळ घेऊन आला. त्याठिकाणी विकाससाठी अनोळखी असलेला सचिनचा साथीदार निलेश पंढरीनाथ अहिरे हा त्यांना भेटला. निलेश अहिरे याने केवळ विकासच्या बॅगेत रक्कम असल्याची खात्री केली. मात्र विकासच्या बॅगेत रक्कम आहे की नाही याची खात्री केली नाही. याचे कारण म्हणजे विकासची सोळा लाखांची रक्कम खरी आहे आणि सचिनची रक्कम नकली आहे हे त्याला अगोदरच ठाऊक होते. सचिनच्या बॅगेत विकासची बॅग ठेऊन घेत निलेश अहिरे जिना चढून जाऊ लागला. त्यामुळे विकासने सचिनला प्रश्न केला की आपली तिप्पट रक्कम कधी भेटणार आहे. त्यावर सचिन त्याला म्हणाला की रेल्वे स्टेशनच्या बाहेर भेटणार आहे, याठिकाणी धोका आहे.
सचिन धुमाळ याने आता पुढची व्युहरचना करुन ठेवली होती. आता पुढील प्लॅन त्याचा मुख्य सुत्रधार आणि साथीदार मार्गदर्शक असलेला पोलिस नाईक योगेश पुंडलिक शेळके हा ऑपरेट करणार होता. ठरलेल्या प्लॅन नुसार पोलिस युनिफॉर्म मधे पोलिस मुख्यालयात सेवेत असलेला श्रेणी पोलिस उप निरीक्षक प्रकाश मेंढे, फैजपूर पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस कर्मचारी दिनेश त्रंबक भोई आणि या घटनेचा सुत्रधार पोलिस नाईक योगेश पुंडलीक शेळके असे तिघे आले. पोलिस वर्दीतील तिघे अचानक आले आणि त्यांनी हातात रोकडची बॅग असलेल्या निलेश अहिरे यास पकडून घेतले. क्षणाचाही विलंब न करता तिघांनी निलेश अहिरे यास रिक्षात बळजबरी बसवून घेण्याचा दिखावा करत फरार झाले. शिवाजी नगरच्या बाजूने निलेश अहिरे याला बॅगसह घेत पोलिस युनिफॉर्म मधील तिघे फरार झाल्यानंतर ग्रामसेवक विकास पाटील बिथरला. रिक्षाने पळून जाणा-या चौघांच्या मागे सचिन धुमाळ हा देखील मोटार सायकलने निघून गेला. आता ग्रामसेवक विकास पाटील हा एकटाच राहिला होता. त्याची सोळा लाख रुपयांची रोकड फसवणूकीने घेऊन सर्वजण निघून गेले होते. आता काय करावे हा प्रश्न विकासपुढे होता. या गडबडीत पळून गेलेल्या सचिन धुमाळ याने विकासला एक मिस कॉल दिला. मात्र या मिसकॉलकडे विकासचे लवकर लक्ष गेले नाही. इकडून विकासने सचिनला फोन केला. त्यावर पलीकडून सचिन त्याला म्हणाला की तु अगोदर फोन उचलला असता तर आपण जागेवरच मॅटर सेट केले असते. आता पैसे तिप्पट करणा-या इसमाला पोलिस एसपी कार्यालयात घेऊन गेले आहेत.
पोलिसांचा धाक दाखवला आणि त्यातल्या त्यात पोलिस अधिक्षक कार्यालयाचे नाव सांगितले म्हणजे विकास पाटील बॅक फुटवर येईल आणि रकमेवरील हक्क सोडून देईल असा विचार सचिन धुमाळ याने मनाशी केला होता. ठरल्याप्रमाणे सहकारी पोलिसांना पाच हजार आणि इतरांना ठराविक हिस्सा दिल्यानंतर राहिलेल्या रकमेवर आपलाच ताबा राहील असा मास्टरमाईंड पोलिस नाईक योगेश शेळके याचा प्लॅन होता. मात्र सोळा लाख रुपयांची रक्कम हातातून गेल्यामुळे अस्वस्थ झालेला ग्रामसेवक विकास पाटील थेट पोलिस अधिक्षक कार्यालयात पोहोचला. त्याठिकाणी त्याला सचिन धुमाळ भेटला. माझे काका एसपी ऑफीसला मोठे साहेब आहेत ते आपल्याला मदत करणार आहे अशी थातुरमातुर बतावणी सचिनने विकासला केली. मात्र विकासचे अस्वस्थ मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याचे सचिनच्या बोलण्याने समाधान झाले नाही.
विकासने त्याच्य ओळखीच्या एका पोलिस कर्मचा-याला फोन लावून आपली व्यथा कथन केली. त्या पोलिस मित्राने विकासला एलसीबी कार्यालयात जावून उपस्थित अधिका-यांना भेटून आपली दर्दभरी दास्तान कथन केली आणि आपण कुणाला या घटने बाबत पकडले आहे का अशी विचारणा देखील केली. मात्र एलसीबी पथकाने या घटनेबाबत कुणालाही पकडले नसल्याचे विकासला त्याठिकाणी समजले. दरम्यान सचिन धुमाळ गायब झालेला होता. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे विकासच्या लक्षात आले होते. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला जावून तक्रार दाखल करावी असा सल्ला विकासला देण्यात आला.
मात्र घाबरलेल्या विकासला काहीच समजत नव्हते. त्यामुळे तो त्या रात्री जळगाव शहर पोलिस स्टेशनला गेला नाही. त्याचे चित्त दुस-या दिवशी कमी अधिक प्रमाणात स्थिर स्थावर झाल्यानंतर तो जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल झाला. प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांना भेटून त्याने आपली व्यथा आणि कथा सांगितली. ग्रामसेवक विकास पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राम शिखरे यांच्याकडे सोपवण्यात आला. सर्व बाजूने तपास केल्यानंतर पोलिस मुख्यालयातील पोलिस नाईक योगेश शेळके हाच या घटनेचा मुख्य सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. योगेश शेळके याच्यासह त्याचा साथीदार सचिन सुनिल धुमाळ (रा. चिंचोली ता. जळगाव), निलेश पंढरीनाथ अहिरे (इश्वर कॉलनी जळगाव), प्रकाश मेंढे श्रेणी पोलिस उप निरीक्षक (रा. पोलिस लाईन जळगाव), दिनेश त्रंबक भोई (पोलिस शिपाई – नेमणूक फैजपूर पोलिस स्टेशन) अशी पाच जणांची नावे या गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाली.
फसवणुकीच्या या गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल श्रेणी फौजदार प्रशांत मेंढे, मुख्यालय पोलिस नाईक योगेश शेळके व फैजपूर पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल दिनेश भोई या तिघांविरुद्ध पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली. पाचही जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सोळा लाख रुपये देखील हस्तगत करण्यात आले. जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या प्रतिमेला काळिमा फासणा-या या घटनेने जनसामान्यात विविध प्रतिक्रिया उमटल्या. पोलिस नाईक योगेश शेळके हा या सर्व गुन्ह्याचा मास्टर माइंड असून त्यानेच सचिन धुमाळ याला हाताशी धरून फसवणुकीचे जाळे विणल्याचे उघडकीस आले. ग्रेड पीएसआय प्रकाश मेढे आणि पोलिस कर्मचारी भोई यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे सांगत वर्दी घालून येण्यास योगेशने तयार केल्याचेही उघडकीस आले आहे. पोलिस कर्मचारी दिनेश भोई हा परेडचा सराव करण्यासाठी फैजपूर येथून जळगावला आला होता. मात्र तो सरावाला न जाता या कटात व मोहात सहभागी झाला आणि निलंबन कारवाईच्या जाळ्यात अडकला.
मोह हे दुखा:चे कारण असते. मात्र तरी देखील प्रत्येक मनुष्य कमी अधिक प्रमाणात कधी तरी मोहाला बळी पडतो आणी आपले नुकसान करुन घेतो. एखादी गोष्ट अशक्यप्राय आहे, धोकादायक आहे हे उघड्या डोळ्यांनी दिसत असून आणि मनाला समजत असूनही काही लोक त्या गोष्टीच्या मोहात पडतात आणि आपले नुकसान करुन घेतात. काही हजार रुपयांच्या मोहात पडून ख-या पोलिसांनी सिनेमातील नकली पोलिसांप्रमाणे खाकी वर्दीचा वापर करुन या घटनेत सहभाग घेतला आणि गुन्ह्यात अडकले. ग्रामसेवक विकास पाटील हा देखील तिप्पट रकमेच्या मोहात पडला. घरातील दोन लाख आणि कर्जाने आणलेले चौदा लाख रुपये असे एकुण सोळा लाख रुपये तिप्पट रकमेच्या मोहात देऊन ग्रामसेवक विकास पाटील फसला. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राम शिखरे व त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. त्यांना हे.कॉ. सतिष पाटील, पो.कॉ. राहुल पांचाळ आदींचे सहकार्य लाभत आहे.