धुळे : धुळे तालुक्यातील बोरविहीर प्लाझा टोल नाक्यावरील शिफ्ट इंचार्जला एका गँगने पाच लाख रुपयांखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास टोलनाका पेटवून देण्याची धमकी देत टोलवरील कर्मचारी वर्गाला गॅंगने शिवीगाळ व धक्काबुक्कीसह पिस्टलच्या गोळीने जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. दि. 22 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेबाबत टोलनाका शिफ्ट इंचार्ज अजय पुनम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिद्धी- सिद्धी असोसिएशन या नावाने बोरविहीर टोल प्लाझा नाक्यावर फिर्यादी व त्यासोबत असलेला कर्मचारी तुषार राजन बागुल कार्यरत असताना रवींद्र मगरे उर्फ पापा याच्या सोबत असलेल्या सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी टोल नाका चालवायचा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. खंडणी न दिल्यास टोलनाका पेटवून देऊ अशी धमकी दिली. फिर्यादीसह त्याच्या सोबत असलेला तुषार बागुल यास गॅंगने शिवीगाळ व धक्काबुकी करत बंदुकीच्या गोळीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक कृष्णा पाटील करत आहेत.