जळगाव : तलवार व चाकूचा वापर करून अतिशय कृरपणे करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्राणघातक हल्ल्यातील घटनेत एकाला त्याचा डावा हात गमवावा लागला आहे.
दि. 4 जानेवारी 2025 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे अशोक रघुनाथ गायकवाड हे त्यांच्या घरात झोपलेले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी तोंडाला रूमाल बांधुन त्यांच्या घरात मागील दाराने प्रवेश केला. आलेल्या दोघा अनोळखी हल्लेखोरांनी काही एक न बोलता त्यांच्याकडील धारदार तलवार व चाकूने अतिशय निर्दयीपणे अशोक गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यात गायकवाड यांच्या डोक्यावर, दोन्ही गालावर व दोन्ही हातांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक गायकवाड यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला.
जखमी अशोक गायकवाड यांची सून बेबाबाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयातील आरोपी हे अनोळखी असल्यामुळे तसेच ही घटना रात्रीच्या वेळी झालेली असल्याने अनोळखी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करणे एक आव्हान होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिसांनी या गुन्हयातील दोन्ही अनोळखी आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणला आहे. देवळी येथील सागर राजू गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीनाचा सहभाग असल्याचे देखील त्याने पोलिसांना कथन केले. अल्पवयीनास अभिरक्षागृह जळगाव येथे जमा करण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील हस्तगत करण्यात आले आहे.
मेहुणबारे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे तसेच पोहेकॉ गोकुळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार, पोना प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, अशोक राठोड, पोकॉ विनोद बेलदार, संजय लाटे, निलेश लोहार, भुषण बावीस्कर आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.