जळगाव : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मानवी जीवांसह पक्षांच्या जीविताला धोकेदायक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आठ जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकर संक्रांतीच्या कालावधीत अशा प्रकारचा धोकेदायक नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो. हा नायलॉन मांजा हा इमारतीमध्ये तसेच झाडांमध्ये अडकतो. नायलॉन मांजा सहजासहजी तुटत नसल्याने कित्येकदा रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांच्या गळ्यात अडकून ते जखमी होतात.
नॉयलॉन मांजाचा गैरवापरामुळे होणा-या दुर्घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने अशा नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि बाळगण्यावर प्रतिबंध घातला आहे. त्याचप्रमाणे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणा-याविरुध्द कडक कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा कब्जात बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. अशी मोहीम यापुढेही राबवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी म्हटले आहे.