जळगाव : विस हजार रुपयांची लाच घेणा-या महावितरण उप अभियंत्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रभाकर इंगळे असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी जळगाव एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. एका खासगी कंपनीच्या नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ करण्यासाठी प्रस्ताव अभियंता प्रशांत इंगळे याच्याकडे पडून होता. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी उप अभियंता इंगळे याने तक्रारदाराकडे सुरुवातीला पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली.
एसीबी पथकाच्या सापळ्यात विस हजाराची लाचेची रक्कम घेतांना उप अभियंता प्रशांत इंगळे यास चोरवड येथे अटक करण्यात आली. पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे तसेच पोलिस नाईक बाळू मराठे व पोलिस कर्मचारी अमोल सूर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सुरु आहे.