सैराट मुकेश – पुजाने पळून पार केले लग्नाचे चरण – टपलेल्या नातेवाईकांनी दिले त्याला रक्तरंजीत मरण 

जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क) : चार वर्ष झाले टॉर्चर करत होते माह्या लेकराले, त्याले मारी टाकू मारी टाकू….शेवटी मारी टाकल. जळगाव शहराच्या पिंप्राळा – हुडको परिसरातील मुकेश शिरसाठ या खून झालेल्या तरुणाच्या आईचे हे शब्द…. माझी एवढीशी मुलगी कुणाच्या भरवशावर सोडू? …..मृत  मुकेश शिरसाठच्या बायकोचे हे शब्द….. जळगावच्या पिंप्राळा हुडको भागात राहणा-या मुकेश शिरसाठ या तरुणाची रविवारी 19 जानेवारी 2025 रोजी त्याच्या सासरच्या मंडळींनी चॉपर आणी कोयत्याने हत्या केली. त्याच्यावर कोयत्याने, चॉपरने निघृणपणे वार करण्यात आले. वार करणा-यांमधे त्याचे सासरे होते, मेहुणे होते. अशी माणसे ज्यांच्या डोक्यात मुकेशबद्दल राग होता. ज्यांच्या डोक्यात स्वत:ची इज्जत गेल्याचा राग होता. मुकेशच्या सासरच्या लोकांनी केवळ जावयावरच हल्ला केला असे नाही तर त्यांच्या टार्गेटवर त्याची गर्भवती विवाहीत मुलगी सुद्धा होती. हा हल्ला नेमका कसा झाला? का झाला? मुकेशची गर्भवती पत्नी नेमकी कुणामुळे वाचली? जळगावचे हे संपुर्ण प्रकरण नेमके काय आहे? हृदय पिळवटून टाकणारा हा तपशील जाणून घेऊया…

मुकेश शिरसाठ आणि पुजा सोनवणे हे दोघे जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात रहात होते. तारुण्यात पदार्पन केलेले दोघेही एकाच समाजाचे होते. दोघांमधे प्रेमाची कळी खुलली. प्रेमाची कळी फुलात रुपांतरीत झाली. बघता बघता दोघांच्या प्रेमाला बहार आला. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचे ठरवले. मात्र पुजाचे कुटूंबीय या प्रेमाच्या विरोधात होते. आपल्या प्रेमाला आणि लग्नाला पुजाच्या परिवाराकडून कडाडून विरोध होत असल्याचे मुकेशच्या लक्षात आले. अखेर एके दिवशी दोघांनी पळून जावून लग्न केले. त्यामुळे पुजाच्या घरच्यांचा विरोध बदला घेण्यात परिवर्तीत झाला होता. पुजा आणि मुकेशच्या परिवारात कटूता निर्माण होण्यास सुरुवात झाली. या वादातून पुजाच्या घरच्यांनी मुकेशला संपवण्याचे निश्चीत केले. गेल्या पाच वर्षापासून या कटूतेची धग सोनवणे परिवारात कायम होती. गेल्या पाच वर्षापासून पुजाच्या परिवारातील सदस्य त्याला ठार करण्यासाठी टपले होते. मुकेश कधी आपल्या तावडीत सापडतो याच्याच ते मागावर होते.

मुकेश आणि पुजाचे प्रेमसंबंध पुजाच्या घरच्यांना समजले तेव्हापासून सोनवणे आणि शिरसाठ परिवारात वादाची ठिणगी पडली होती. त्यातून पुजाच्या कुटूंबातील सदस्यांनी मुकेशला अनेकदा धमकावले सुद्धा. त्यात शनिवार 18 जानेवारी रोजी दोन्ही कुटूंब आमने सामने आले. यावेळी हाणामारी देखील झाली. त्यानंतर रामानंद नगर पोलिस स्टेशनला मुकेशच्या कुटूंबाने तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत दोघा परिवाराचे समुपदेशन केले. मात्र पोलिसांनी किरकोळ वाद आहे असे म्हणत तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोप मुकेशच्या परिवाराकडून करण्यात आला.

मुकेश हमाली काम करुन घर चालवत होता. त्याला आणि पुजाला एक छोटी मुलगी होती. तर पुजा सात महिन्यांची गर्भवती देखील होती. आई घरकाम करायची आणि मुकेशचे वडील देखील हमालीकाम करायचे. सगळा संसार सुरळीत सुरु होता. मात्र टेंशन होते ते दोन परिवारातील वादाचेच. शनिवारी या वादाने पुन्हा डोके वर काढले आणि त्यानंतर आली रविवारची दुर्दैवी सकाळ.

रविवारी सकाळी मुकेश सामान आणण्यासाठी दुकानात गेला त्यावेळी गाढे चौकात त्याला घेरण्यात आले. त्याला घेरणारे पुजाचे नातेवाईक होते. तिचे काका, तिचे भाऊ आणी इतर सगळे नातेवाईक. त्यांनी मुकेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुला फार माज आलाय. तु पुजासोबत पळून जावून लग्न केले. तु लग्न केले तेव्हा आम्ही तुला सोडले. आता मात्र सोडणार नाही. तुला आणि तुझ्या घरच्यांना संपवणार असे म्हणत पुजाच्या घरच्यांनी मुकेशवर कोयता आणि चॉपरने वार करण्यास सुरुवात केली. मानेवर घाव बसलेल्या मुकेश जीवाच्या आकांताने ओरडला. त्याचा आवाज ऐकून त्याच्या घरातील सदस्य धावत गाढे चौकात पळत आले.

त्याठिकाणी पोहोचल्यावर समोर दिसणारे दृश्य मन हेलावणारे होते. मुकेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. मुकेशच्या आईने, भावाने, वडीलांनी मुकेशला वाचवण्याचा प्रयंत्न सुरु केला. मात्र पुढच्याच क्षणी पुजाच्या घरच्या सदस्यांनी त्यांच्यावर देखील चॉपर आणि कोयत्याने  हल्ला करण्यास सुरुवात केली. मुकेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून मुकेशच्या परिवारातील इतर सदस्यांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. हे बघून पुजाच्या घरची मंडळी बिथरली. त्यांनी या नातेवाईकांना अडवले. त्यांनी मुकेशच्या नातेवाईकांना अडवत शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. हातावर, डोक्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यांच्याकडून कशीबशी सुटका करुन घेत मुकेशचा भाऊ रामानंद नगर पोलिस स्टेशनला आला. त्याठिकाणी त्याने घटनेची हकीकत कथन केली.  

त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुजाचे काका सतिश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलु बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अविनाश सुरवाडे, बबल्या गांगले यांना ताब्यात घेतले. तसेच उर्वरीत दोघांचा शोध सुरु करण्यत आला. मुकेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मुकेशला मृत घोषित केले. मानेवर खोलवर जखम झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यु झाला होता. त्याचे सात नातेवाईक जखमी झाले होते. सर्व जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. उपचारा दरम्यान मयत मुकेशचा भाऊ सोनु याने दिलेल्या जवाबानुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला पुजाचे काका सतीष जुलाल केदार, पुजाचा भाऊ प्रकाश शंकर सोनवणे, सुरेश भुताजी बनसोडे, बबलु सुरेश बनसोडे, पुजाचा चुलत भाऊ राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, आतेभाऊ अश्निन सुरवाडे, विक्की राजु गांगले, बबल्या राजु गांगले अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 33/25 भारतीय न्याय संहिता 103 (1), 109, 118 (2), 189 (2), 190, 191 (2), 191 (3), 324 (4) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला. 

मुकेशच्या काकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री झालेल्या वादानंतर पुजाच्या नातेवाईकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली. तिचे मामा व काका यांनी नातेवाईकांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. त्यांना माहिती होते की मुकेश रविवारी घरीच असतो. तो घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी रविवारीच ट्रॅप लावला. मुकेशने त्यांच्या संमतीशिवाय लग्न केल्याचा राग त्यांच्या डोक्यात होता. गेल्या पाच वर्षापासून त्याला मारण्याचे प्रयत्न सुरु होते. ज्यांनी आमच्या मुलाला मारले त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांचेही एक दोन खल्लास करु तरच राहू असेही मुकेशचे काका माध्यमांसमोर म्हणाले.

या सर्वात आणखी एक गंभीर घटना म्हणजे मुकेशच्या नातेवाईकांवर वार केल्यानंतर पुजाचे नातेवाईक मुकेशच्या घरात घुसले. त्यांनी गर्भवती पुजाला धमकी दिली की तिकडे डिलीव्हरीला चल नाहीतर दगड घालतो तुला आणि तुझ्या पोटातील बाळाला देखील संपवतो असे म्हणत ते पुजाच्या अंगावर धावले. तोवर आपल्या भावाच्या खूनाची माहिती समजलेली मुकेशची बहिण तिथे आली. ती मधे पडली आणि तिने सगळ्या हल्लेखोरांना मागे ढकलले. अगदी थोडक्यात पुजाचा आणि तिच्या पोटातील बाळाचा जीव वाचला.

मुकेशच्या खूनानंतर त्याची पत्नी पुजा हिने माध्यमांना प्रतिक्रिया दिली की आम्ही एकाच जातीचे असून आम्ही प्रेमविवाह केला. लग्न झाल्यापासून मी एकदाही महेरी गेलेली नाही. जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून माझ्या माहेरचे माझ्या पतीला टॉर्चर करत होते. माझी मुले कुणाकडे दाद मागणार? तुम्हाला जर तुमची मुलगी लागत होती तर माझा हिरा का हिरावून घेतला? आक्रोश करणा-या पुजाची मागणी एकच आहे ती म्हणजे मला न्याय हवा.

Oplus_131072

मुकेशच्या बहिणीने मात्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलतांना ती म्हणाली की माझ्या भावावर जमावाने हल्ला केला. मान कापून त्याला ठार केले. त्याला न्याय मिळाला पाहिजे. जेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो तेव्हा त्याला मारुन टाकू द्या तेव्हा आम्ही बघू असे पोलिस म्हणाले. पोलिसच असे म्हणत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? पुजाच्या नातेवाईकांना नातेवाईक असलेल्या पोलिसाचा पाठींबा होता. त्यानेच सांगितले होते, तुम्ही मारुन टाका मी सांभाळून घेतो. पोलिसांनी माझ्या भावाला परत आणावे. न्याय मिळाला नाही तर आम्ही स्वत:ला संपवून घेऊ. असा इशाराही मुकेशच्या बहिणीने दिला आहे.

आपल्या प्रतिष्ठेपायी पुजाच्या नातेवाईकांनी मुकेशची हत्या केली. त्याच्या परिवारावर वार केले. आपल्या गर्भवती मुलीच्या पोटावर दगड घालण्याची धमकी दिली. मुकेशच्या कुटूंबाने एका बाजूने न्याय मिळण्याची मागणी केली तर दुस-या बाजूला सुड घेण्याची भाषा देखील केली आहे. जळगाव शहराच्या पिंप्राळा हुडको परिसरातील गाढे चौकात झालेल्या या घटनेप्रकरणी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे. तो म्हणजे मुकेशला न्याय कधी मिळणार? डोक्यावरचा आधार हरवलेल्या मुकेशच्या लहान बाळाचा आणि अद्याप जगही न पाहिलेल्या पोटातील बाळाचा नेमका दोष काय?   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here