नंदुरबार : रेल्वेत बसण्याच्या जागेवरून झालेला वाद व त्यातून टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये नंदुरबार रेल्वे स्थानकात रविवारी ही घटना घडली होती. सुमेरसिंग जबरसिंग (रा. बाकेसर जिल्हा जोधपुर) असे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
हल्लेखोर आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मयत सुमेरसिंग यांच्या नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला होता. पोलिसांनी शोकसंतप्त नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेतील दुसरा जखमी प्रबंतसिंग डोंगरसिंग परियार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जोधपूर एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधे बसण्यासाठी जागेचा वाद वाढत गेला. एक्स्प्रेस नंदुरबार स्थानकात येण्यापूर्वी संबंधित प्रवाशाने त्याच्या मित्रांना हल्ला करण्यासाठी मोबाईल द्वारे संपर्क साधत बोलावले होते. चार ते पाच जणांनी थेट जनरल बोगीत प्रवेश करून दोघा प्रवाशांना बेदम मारहाण करत चाकूहल्ला केला होता.