जळगाव : रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आठ घरफोडयांचे गुन्हे उघडकीस आणले असून पाच सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. अटकेतील सराईत गुन्हेगारांच्या ताब्यातून दहा तोळे सोने व 650 ग्रॅम चांदी तसेच एलईडी टीव्ही असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या घरफोड्या सागर शिवराम डोईफोडे व त्यांच्या साथीदारांनी केल्याची गुप्त माहिती समजल्यानंतर संशयीत सागर शिवराम डोईफोडे यास ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीअंती त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सहा घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल झाली.
उकल झालेल्या सहा गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी एकूण दहा तोय सोने व 650 ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने नितेश मिलींद जाधव, दिपक विनोंद आढाळे, रवी भागवत सोनवणे, अनिल ऊर्फ मारी भगवान सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपुस करण्यात आली त्यांनी दिलेल्या कबुलीच्या आधारे त्यांच्याकडून एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आला.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, पोहेकॉ जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, पोहेकॉ सुशिल चौधरी, पोहेकॉ इरफान मलिक, पोना हेमंत कळसकर, पोना रेवानंद साळुखे, पोना विनोद सुर्यवंशी, पोशि रविंद्र चौधरी, उमेश पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विठ्ठल पाटील व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे पुढील तपास करत आहेत.