जळगाव : अवैध वाळू वाहतुकीसह कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची वाहतूक जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोखली. अवैध वाळू वाहतुकीबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तर गोवंशाच्या वाहतुकी विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही कारवाया जळगाव एलसीबी पथकाने केल्या आहेत.
पहिल्या कारवाईत 9 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नॅशनल हायवे क्रमांक 46 नजीक आकाशवाणी चौकातील वेलनेस मेडिकल समोरील रस्त्यावर डंपर क्र. MH-19-Z-7774 वरील चालक रविंद्र राजु सोनवणे आणि योगेश किरण रंधे असे दोघेजण विना पास परवाना चोरीची वाळु त्यांचे मालक रमेश यशवंत पानपाटील यांच्या सांगण्यावरून संगणमताने सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातून 12 हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू चोरी करून नेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला आढळून आले. त्यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाई सकाळी पाच वाजता मेहरून परिसरातील मास्टर कॉलनी येथे पशुधनाची कत्तलीसाठी जाणारी अवैध वाहतूक रोखण्यात आली. फैजान खान युसुफ कुरेशी हा त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकप वाहनातून चार गो-हे निर्दयीपणे कोंबून नेतांना आढळून आला. त्याच्या ताब्यातील गोवंश आणि वाहन असा एकूण 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चारही गो-हे कुसुंबा येथील रतनलाल की बाफना गो अनुसंधान येथे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतूल वंजारी, विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, राजेश मेढे, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख याकुब, हरीलाल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.