ज्वेलर्स शॉप घरफोडीचा गुन्हा उघडकीस

जळगाव : पाचोरा शहरातील ज्वेलर्स शॉप मधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी  पाचोरा पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील एका कुख्यात गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे. 

दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाचोरा शहरातील राहुल विश्वनाथ चव्हाण यांच्या मालकीच्या पाटील ज्वेलर्स या दुकानात घरफोडी झाली होती. या दुकानाचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी प्रवेश करत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली होती. दुकानातील डीव्हीआर सह 68 हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती. या घटनेप्रकरणी राहुल विश्वनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे तपास पथक याकामी कार्यरत होते. पोलीस पथकाने फिंगर प्रिंट तज्ञ, डॉग स्कॉड व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज आदींच्या मदतीने तपास कामाला सुरुवात केली. एक पांढ-या रंगाची बोलेरो या गुन्ह्यात वापरल्याचे आढळून आले. या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज सर्व पोलीस स्टेशनला प्रसारित करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून एक बोलेरो वाहन चोरी झाले होते. त्या चोरी झालेल्या बोलेरो वाहनाचा तपास धरणगाव पोलीस करत होते. याच कालावधीत 7 फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत काहीजण चोरीचे बोलेरो वाहन सोडून फरार होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. या घटनेत रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर परिसरातील रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी हा असल्याची पक्की खात्री रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाला झाली. 

रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने रणजीत सिंग जुन्नी यास ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बोलेरो वाहन चोरी केल्याची कबुली दिली. बोलेरो वाहन चोरी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून चोरीचे बोलेरो वाहन हस्तगत करण्यात आले. सखोल चौकशीअंती त्याने खामगाव बुलढाणा येथे एटीएम फोडून ते चोरीच्या बोलेरो वाहनातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याची देखील कबुली दिली आहे. या घटने प्रकरणी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पाचोरा पोलिसांनी रणजीत सिंग जुन्नी यास संशयाच्या आधारे धरणगाव पोलिसांकडून ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने ज्वेलरी शॉप मधील घरफोडी केल्याचे कबुल केले. हा गुन्हा त्याने आपले साथीदार हघुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीवगांधी नगर, जळगाव), सुवेरसिंग राजुसिंग टाक (रा. मानवद परभणी) व शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा. बोंड परभणी) यांचे मदतीने केल्याचे कबुल केले. घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जळगाव येथील सोनाराकडे गहाण ठेवल्याची त्याने कबुली दिली. 

या सराफी दुकानात त्याने घरफोडीच्या गुन्ह्यातील दागिने गहाण ठेवले होते त्या दुकानदाराकडून 67081 रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलीसांना यश आले आहे. अटकेतील रणजीत सिंग जुन्नी याच्याविरुद्ध जळगाव शहरातील रामानंद नगर, जिल्हा पेठ, शनिपेठ, खामगाव, एरंडोल आदी पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील कुविख्यात गुन्हेगार आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, हेकॉ राहुल शिंपी, सहायक फौजदार रणजित पाटील, पोकॉ योगेश पाटील, सागर पाटील, मजिदखान पठाण आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here