मुंबई : मुंबईत दाखल झालेली अभिनेत्री कंगना संतापली आहे. मुंबई मनपाने कंगनाच्या पाली हिल येथील कथीत कार्यालयावर कारवाई केली. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनाने थेट शिवसेनेवर हल्ला चढवला. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत टीका केली. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने तिच्या कार्यालयातील व्हिडीओ पोस्ट करत आपल्या संतापाला वाट करुन दिली.
कंगनाने १२ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला. या व्हिडीओमध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसून येत आहे. पडलेले छत, मोडलेल्या वस्तू त्यात दिसत आहेत. ‘डेथ ऑफ डेमोक्रसी’ अशा तीन शब्दांत कंगनाने तिच्या कार्यालयावरील कारवाईवर भाष्य केले. कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी मुक्कामाला आहे.
आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार तुटेल अशा शब्दात तिने आपल संताप व्यक्त केला आहे. वेळ एकसारखी नसते. असे करून तुम्ही माझ्यावर उपकार केले आहे. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होते मात्र आज मी स्वतः अनुभव घेतला आहे. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवर देखील चित्रपट तयार करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र,”असे म्हणत कंगनाने ट्विट केले आहे.
कंगनाने तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत कॅबिन केली आहे. स्टोअर रूमच्या जागेत बेकायदा स्वयंपाकघर केले आहे. जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार केली आहे. जिन्यालगत तसेच तळमजल्यालगत पार्किंग लॉटमध्ये दोन बेकायदा शौचालये बांधली आहेत. पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे कॅबिन तयार केली आहे. देवघरातच बैठकीसाठी खोली व स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय बांधले आहे. पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला आहे.
दुसर्या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत देखील तिने बेकायदा बदल केला आहे. बाल्कनीत देखील फेरफार केला आहे. स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार तिने केला आहे. शौचालय तोडून त्या जागेवर इतर गोष्टींचा वापर केला आहे. शेजारच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून ती जागा स्वत:च्या बंगल्यात समाविष्ट करुन घेतली आहे. बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा देखील तिने बदलली आहे. मुंबई महापालिकेकडून सुरु असलेल्या या कारवाईला उच्च न्यायालयाकडून तिने स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे कंगनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.