नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने खासगीकरणाचा धडाका सुरु केला आहे. बँक, रेल्वे आणि विमानतळानंतर आता मोदी सरकार इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमधील आपला हिस्सा विक्री करण्याच्या बेतात आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मधील १५ ते २० टक्के हिस्सा ऑफर ऑफ सेल्सच्या माध्यमातून विक्री करण्याची केंद्र सरकारची योजना सुरु आहे. या वृत्तामुळे आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांनी घसरण झाली आहे. आठवड्याच्या तिसर्या दिवशी शेअर मार्केटमध्ये आयआरसीटीसीचा शेअर १३३० रुपयांवर होता. मंगळवारी आयआरसीटीसीचा शेअर २.५७ टक्क्यांनी कमी झाला. तो १३७८.०५ रुपयांवर बंद झाला होता. दोन दिवसांत शेअरच्या किंमतीत ७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
सरकारने १५१ रेल्वे गाड्यांच्या १०९ मार्गावर खासगी कंपन्यांना प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी दिली आहे. या माध्यमातून केंद्र शासनाला ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वेच्या एकूण नेटवर्कपैकी केवळ ५ टक्के खासगीकरण केले जाणार आहे. या गाड्या एकुण १२ क्लस्टरमध्ये चालतील. या क्लस्टरमधे बंगळुरु, चंदीगड, जयपूर, दिल्ली, मुंबई, पटना, प्रयागराज, सिकंदराबाद, हावडा आणि चेन्नई आदींचा समावेश आहे.