रिल स्टार मुलाच्या त्रासाने पार वैतागला जन्मदाता — कुविचारातून बाप विठ्ठल बनला त्याचाच मृत्युदाता 

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): हितेश उर्फ विकी विठ्ठल पाटील हा इंस्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वरील रिल स्टार होता. त्याचे असंख्य चाहते होते. रिल्सच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत होती. रिल्सच्या माध्यमातून तो महिन्याला जवळपास 30 ते 35 हजार रुपयांची कमाई देखील करत होता. अवघा 24 वर्ष वयाचा विकी रिल्सच्या माध्यमातून चांगली कमाई करत असल्यामुळे त्याच्या बॅंक खात्यात पैसे खुळखुळ करत होते. कामधंदा न करता कमी वयात केवळ रिल्सच्या माध्यमातून लक्ष्मी प्राप्ती होत असल्यामुळे तो व्यसनाच्या आणि रागाच्या आहारी गेला. अल्लड वयात त्याला दारु पिण्याचे व्यसन जडले. मद्यप्राशन केल्यानंतर तो आपल्या जन्मदात्या पित्याला मारहाण देखील करत असे. घरातील सर्वच सदस्य त्याच्या शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला वैतागले होते.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी वृंदावन नगर परिसरात विवाहीत विकी हा त्याची पत्नी शितल, आई संगिता आणि वडील विठ्ठल सखाराम पाटील अशांसह रहात होता. पाच महिन्यापुर्वी विकी हा त्याची पत्नी शितलच्या बाळाचा बाप झाला. रिल्सच्या माध्यमातून मिळणारी कमाई आणि सेवानिवृत्त सैनिक असलेल्या वडीलांची पेंन्शन अशा दुहेरी कमाईच्या बळावर त्यांचा परिवार सुखाने सुखाने सुरु होता. एकंदरीत सर्वकाही सुरळीत सुरु असतांना त्याला मद्यप्राशन करण्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले. त्यामुळे सुरु झाली त्याच्या परिवाराची अधोगती.

एरंडोल येथील रहिवासी सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल सखाराम पाटील यांचे धरणगाव तालुक्यातील भवरखेडा हे मुळ गाव आहे. भवरखेडा या गावी त्यांचे भाऊ नामदेव सखाराम पाटील व त्यांचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील राहतात. विक्कीला मोठ्या प्रमाणात जडलेले दारुचे व्यसन सोडवण्यासाठी  शिर्डी येथील व्यसनमुक्ती केंद्रात प्रयत्न देखील करण्यात आले. मात्र ते प्रयत्न निष्फळ ठरले. त्याचे दारु पिण्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढतच होते. दारुची मोठ्या प्रमाणात धुंदी चढली म्हणजे तो त्याच्या पत्नीला व जन्मदात्या वडीलांना मारहाण करत असे. वेळ प्रसंगी आईला देखील शिवीगाळ करायचा. त्याच्या त्रासाचा अतिरेक झाला म्हणजे परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या मुळगावी भवरखेडा येथे नामदेव पाटील यांच्याकडे राहण्यास जात होते. त्यानंतर विकीत्यांना घेण्यासाठी भवरखेडा या गावी जात असे. हा नेहमीचा ठरलेला प्रकार होता. “पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोका झेंडा” या म्हणीला विकीपात्र ठरला नव्हता. विठ्ठल पाटील यांच्या नशीबी अपत्य सुख नव्हते.

24 फेब्रुवारी 2025 रोजी सोमवारी नेहमीप्रमाणे विकीमद्याच्या नशेत बेधुंद झाला होता. या दिवशी त्याने मद्याच्या नशेत पत्नी शितल हिस फोन करुन चिकन बनवण्याचे अर्थात मांसाहारी स्वयंपाक करण्याचे फर्मान सोडले. आज एकादशी आणि सोमवार असल्याचे योग्य कारण पुढे करत पत्नी शितलने त्याला आज मी चिकन बनवणार नाही असे स्पष्ट सांगत नकार दिला. पत्नी शितलचा नकार ऐकून त्याच्या रागाचा पारा सरकन वर चढला. त्याने फोनवरच तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे हा प्रकार तिने तिचे सासरे अर्थात विक्कीचे वडिल विठ्ठल पाटील यांच्या कानावर टाकला.

suspected bhalchandra

आता नेहमीप्रमाणे विकी घरी येवून आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण करेन अशी भिती विठ्ठल पाटील यांना सताऊ लागली. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांनी भवरखेडा येथे जाण्याचे निश्चित केले. त्यांनी सुन शितल हिस त्यांच्या ताब्यातील अ‍ॅक्टीव्हा या दुचाकीवर बसवून विखरण गाठले. तेथून त्यांनी पत्नी संगिताला देखील सोबत घेत ट्रिपलसिट भवरखेडा गाठले. सायंकाळी विकीभवरखेडा येथे आपला शोध घेत येईल आणि नेहमीप्रमाणे आपल्याला मारहाण व शिवीगाळ करेल अशी भिती विठ्ठल पाटील यांना सताऊ लागली. त्यामुळे त्याला रस्त्यातच अटकाव केला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला. ती भिती त्यांनी भाऊ नामदेव पाटील व पुतण्या भालचंद्र पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे तिघांनी संगनमताने त्याला वाटेतच अडवून समजावून सांगण्याचे निश्चित केले.

सायंकाळी जेवण आटोपून विठ्ठल पाटील, भाऊ नामदेव पाटील व त्यांचा मुलगा भालचंद्र पाटील अशा तिघांनी वेगवेगळ्या मोटार सायकलने गावातील जेसीबी चालक रविंद्र पाटील यास सोबत घेत  मार्गक्रमण केले. विठ्ठल पाटील यांच्या सांगण्यानुसार जेसीबी चालक रविंद्र पाटील हा देखील त्यांच्यासोबत आला होता. रविंद्र पाटील याने त्याच्या सोबतीला त्याचा मित्र किशोर उर्फ दादा पाटील याला देखील घेतले. सर्वजण एरंडोलच्या दिशेने मार्गक्रमण करत असतांना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वाटेत टोळी गावानजीक त्यांना मद्यधुंद अवस्थेत विकीभेटला.

या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याला त्रास न देण्याबाबत समजावून सांगण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र मद्याच्या आहारी गेलेला विकी कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. सर्व जण त्याला समजावून सांगण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होते. याउलट त्याने मद्याच्या आणि रागाच्या नशेत त्याचे वडील विठ्ठल पाटील, काका नामदेव पाटील आणि इतरांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या या नेहमीच्या मारहाणीच्या त्रासाला सर्व जण प्रचंड वैतागले होते. 

अखेर विकीचे वडील विठ्ठल पाटील यांचा संयम सुटला. त्यांनी सोबत असलेला जेसीबी चालक रविंद्र पाटील यास आडोशाला नेले. आडोशाला नेत त्यांनी रविंद्र पाटील यास सांगितले की तु विकीचा कायमच काटा काढ. मी तुला दोन लाख रुपये देतो. तो पुन्हा घरी परत येता कामा नये. त्यानंतर रविंद्र पाटील व त्याच्यासह केवळ सोबती म्हणून आलेला किशोर पाटील असे दोघेच जण विकी सोबत थांबले. इतर सर्व जण आपल्या मुळ गावी भवरखेडा येथे निघून आले. यावेळी आपल्याला अजून मद्य प्राशन करायचे आहे असे विकी ने रविंद्रला म्हटले. विकीचा कायमचा काटा काढायचा असल्यामुळे रविंद्रने त्याला चल असे म्हणत दुचाकीवर बसवले.

रविंद्रसह त्याचा सोबती किशोर आणि मद्याच्या नशेतील विकीअसे तिघेजण मोटार सायकलवर बसले. टोळी गावाच्या पुढे बोरगाव नजीक एका हॉटेलवर तिघे जण गेले. याठिकाणी रविंद्र आणि विकी या दोघांनी मद्यप्राशन केले. अगोदरच मद्याच्या आहारी गेलेल्या विकी ने अजून मद्यप्राशन केले. त्यामुळे त्याचे भान हरपले. मला पुणे येथे जायचे आहे, मला हायवे वर सोड असे तो रविंद्रला म्हणू लागला. पोटात अगोदरच दारुचा कोटा पुर्ण झालेला असल्यानंतर देखील त्याने सोबत अजून एक दारुची बाटली घेतली. तिघे जण महामार्गावर आले असतांना विक्कीला पुन्हा दारु पिण्याची इच्छा झाली. त्यामुळे तो रविंद्रला हॉटेलवर घेऊन चल असे म्हणाला. त्यामुळे रविंद्रने त्याला पुन्हा नजीकच्या हॉटेलवर दारु पिण्यासाठी नेले.

Rajesh patil ASI

यावेळी पुन्हा रविंद्र आणि विकी या दोघांनी हॉटेल परिसरात मोकळ्या मैदानावर दारु घेतली. रविंद्रने विक्कीला पुर्णपणे दारुच्या अधीन केले. त्यानंतर तिघे जण मोटार सायकलवर बसून भवरखेडा शिवारातील एका शेतात असलेल्या शेडमधे झोपण्यासाठी गेले. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कुणीही नसते याची रविंद्रला चांगल्या प्रकारे माहित होते. पुढे नेमके काय होणार आहे आणि रविंद्रच्या मनात काय सुरु आहे याबाबत सोबत असलेला किशोर पाटील मात्र अनभिज्ञ होता. यावेळी अनभिज्ञ असलेल्या किशोर पाटील यास त्याच्या घरुन सारखे सारखे फोन येत होते. फोनवर त्याला घरी बोलावणे सुरु होते. त्यामुळे किशोरने रविंद्रला म्हटले की मला घरी जायचे आहे, मला घरुन सारखे सारखे फोन येत आहे. त्यामुळे रविंद्रने त्याला त्याच्या ताब्यातील मोटार सायकल किशोरला देत घरी जाण्यास सांगितले.

आता निर्जन शेतातील शेडमधे केवळ मद्यधुंद विकी आणि रविंद्र असे दोघेच जण राहिले होते. रविंद्रने विकीसोबत मद्यप्राशन केले असले तरी तो जाणीवपुर्वक भानावर होता. एकाच खाटेवर दोघे झोपल्यानंतर काही वेळाने रविंद्र हळूच उठला. विकी पुर्णपणे मद्याच्या आहारी गेला असल्याचे बघून त्याने जवळच असलेल्या शेतातून पाईपाला बांधलेली दोरी सोडून आणली. पुन्हा शेडमधे आल्यानंतर त्या दोरीने त्याने खाटेवर झोपलेल्या विक्कीला गळफास दिला. मद्याच्या आहारी असलेल्या विक्कीने अजिबात प्रतिकार केला नाही. अती मद्यपानामुळे त्याच्या अंगी प्रतिकार करण्याचे त्राण आणि भान राहिले नव्हते.  विकीमरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर परत जाण्यासाठी जेसीबी चालक असलेल्या रविंद्रजवळ मोटार सायकल नव्हती. त्याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल किशोर पाटील याला दिली होती. त्यामुळे परत जाण्यासाठी त्याने विक्कीचा चुलत भाऊ भालचंद्र यास फोन करत मोटार सायकल घेऊन येण्यास सांगितले. 

शेतात विकी गळफास दिल्याने मरण पावला असल्याचे भालचंद्र यास माहिती नव्हते. त्यामुळे तो आपल्याला मारहाण करेल असे समजून तो घाबरला. त्यामुळे भालचंद्रने एकट्याने जाण्याऐवजी वडील नामदेव यांना सोबत घेऊन जाण्याचे ठरवले. भालचंद्रने त्याचे वडील नामदेव यांना झोपेतून उठवले. तो वडील नामदेव पाटील यांना मोटार सायकलवर डबलसिट घेऊन शेतात रविंद्रजवळ आला. वाटेत त्यांना रविंद्र पायी पायी येतांना दिसला. त्यावेळी आपण विकीला गळफास देऊन ठार केल्याचे रविंद्रने दोघांना सांगितले. रविंद्रचे बोलणे ऐकून दोघे पिता पुत्र मनातून पार घाबरले. आता काय करायचे असा प्रश्न भालचंद्र आणी त्याचे वडील नामदेव यांना पडला.

घटना काय घडली आहे आणि त्यावर आता काय उपाययोजना करायची हे विचारण्यासाठी त्यांनी मयत विक्कीचे वडील व माजी सैनिक विठ्ठल पाटील यांना फोनवर सांगत घराबाहेर येण्यास सांगितले. जेसीबी चालक रविंद्र पाटील, भालचंद्र पाटील व नामदेव पाटील असे तिघे जण मोटार सायकलने भवरखेडा गावात आले. विठ्ठल पाटील घरातून बाहेर आल्यानंतर रविंद्र आणि नामदेव यांच्यात विकीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर चर्चा झाली. दरम्यान भालचंद्र घरात झोपण्यास निघून गेला. चर्चेअंती विठ्ठल पाटील यांनी रविंद्रला त्याचे जेसीबी मशीन धरणानजीक पात्रात घेऊन येण्यास सांगितले. धरणाजवळ जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदून त्यात विक्कीचा मृतदेह पुरण्याचे विठ्ठलने रविंद्रला सांगितले. जन्मदात्या बापाने मुलाचा मृतदेह गुपचूप पुरण्याचे काम रविंद्रला सोपवले.

ठरल्यानुसार नामदेव आणि विठ्ठल हे दोघे भाऊ मोटार सायकलने गोविंदबाबा धरणाच्या कोरड्या पात्रात आले. त्यांच्या पाठोपाठ रविंद्र त्याचा जेसीबी घेऊन आला. त्याठिकाणी जेसीबी थांबल्यानंतर विठ्ठल आणि रविंद्र या दोघांनी शेताच्या शेडमधील विक्कीचा मृतदेह मोटार सायकलवर मधोमध बसवून जेसीबी जवळ आणला. जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदून तो मृतदेह त्या खड्ड्यात विठ्ठलच्या सांगण्यावरुन जेसीबीने उचलून पुरण्यात आला. या सर्व घटनाक्रमात दुसरा दिवस अर्थात 25 फेब्रुवारीचा दिवस सुरु झाला. रात्रीचे दोन वाजले होते. विक्कीचा मृतदेह खड्ड्यात पुरल्यानंतर तिघेही आपापल्या घरी निघून गेले.

त्यानंतर पहाटेच्या सुमारास भवरखेडा येथे घरातील सर्व सदस्य हजर होते. मात्र रात्रीच्या प्रसंगाची मयत विक्कीची पत्नी शितल हिस कोणतीही कल्पना नव्हती. विकी ला रागाच्या भरात मारहाण करण्यात आली एवढे तिला समजले होते. मात्र विक्कीला ठार करण्यात येवून त्याचा मृतदेह धरणाच्या पात्रात जेसीबीने पुरण्यात आला असल्याचे तिला माहिती नव्हते. विकी जीवंत असल्याचे भासवून विठ्ठल पाटील यांनी त्यांचे व्याही अर्थात सुन शितलचे वडील निवृत्ती पाटील यांना फोन करुन भवरखेडा येथे बोलावण्यात आले. तुम्ही भवरखेडा येथे येऊन विकीची समजूत घाला असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार शितलचे वडील भवरखेडा येथे आले. मात्र बराच वेळ वाट बघूनही विकी भवरखेडा येथे आला नाही. त्यामुळे शितलचे वडील आपल्या घरी चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथे निघून गेले.

या सर्व घटनाक्रमानंतर विठ्ठल पाटील मनातून फार अस्वस्थ झाले. आपल्या पोटच्या मुलाच्या खूनास आपणच जबाबदार असल्याचे शल्य त्यांच्या मनाला बोचू लागले. राहून राहून त्यांचे मन त्यांना काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हते. मी एरंडोल येथे जावून विकीला बघून येतो असे उद्विग्न मनस्थितीत म्हणत विठ्ठल पाटील दुपारी जागेवरुन उठले. ते एरंडोल येथील घरी एकटेच आले. घरातील दारे खिडक्या बंद करुन त्यांनी आत्महत्या करण्याचे मनाशी निश्चित केले. तत्पुर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून काढली. त्यात हितेश उर्फ विकीयाच्या मरणास आपणच कारणीभूत असल्याचे त्यांनी कबुल करत तसे नमुद केले. रात्री दोन वाजता त्याला धरणाच्या पात्रात आपण पुरुन आल्याचे देखील त्यांनी नमुद केले. किती दिवस मुलाच्या हातून मार खायचा …सॉरी अशा स्वरुपाचा काही ओळींचा मजकूर त्यांनी अहिराणी भाषेत लिहून काढला. त्यानंतर त्यांनी घराच्या छ्ताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

त्यानंतर सायंकाळ झाली तरी देखील विठ्ठल पाटील भवरखेडा येथे परत आले नाही. त्यामुळे घरातील सर्वच सदस्य हवालदिल झाले. विठ्ठल पाटील अद्याप घरी का परत आले नाही म्हणून त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते  मोबाईल देखील उचलत नव्हते. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका सर्वांच्या मनात येण्यास सुरुवात झाली. विचारात पडलेली त्यांची पत्नी संगिता आणि पुतण्या भालचंद्र असे दोघे मोटार सायकलने एरंडोल येथे जाण्यास निघाले. एरंडोल येथे घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच वेळ आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेरीस एरंडोल पोलिस स्टेशनला या प्रकाराची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. आतून बंद असलेल्या घराचा दरवाजा तोडून पोलिस पथकाने प्रवेश केल्यानंतर विठ्ठल पाटील यांनी घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान मयत विठ्ठल पाटील यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटनुसार त्यांचा मुलगा हितेश उर्फ विकी याचा मृतदेह धरण परिसरात पुरला असल्याची माहिती समोर आली.  

या माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले आदींनी घटनास्थळी भेट दिली. जेसीबीच्या मदतीने विकीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यावेळी अमळनेर उप विभागाचे डीवायएसपी विनायक कोते व तहसीलदार महेश सुर्यवंशी उपस्थित होते. विकीचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेप्रकरणी सर्व बाजूने माहिती संकलीत झाल्यानंतर त्याची पत्नी शितल पाटील हिने दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शीतल पाटील हिने फिर्यादीत म्हटले की तिचे सैन्यातून निवृत्त झालेले सासरे हे शरीराने मजबूत नव्हते मात्र तिचा पती शरीराने धडधाकट होता. त्यामुळे पती विकी यास मारणे एकट्याचे काम असू शकत नाही. एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शितल पाटील हिने तीचे आत्महत्या करणारे मयत सासरे विठ्ठल सखाराम पाटील, चुलत सासरे नामदेव सखाराम पाटील, चुलत दिर भालचंद्र नामदेव पाटील अशा तिघा संशयितांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील अधिकच्या तपासात जेसीबी चालक रविंद्र पाटील याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला देखील संशयीत आरोपी करण्यात आले. एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक निलेश गायकवाड यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले, सहायक पोलिस निरीक्षक शंकर पवार, सहायक फौजदार राजेश पाटील, हे.कॉ. अनिल पाटील, कपील पाटील, पोलिस नाईक संदीप पाटील, मिलिंद कुमावत, सचिन पाटील, योगेश महाजन, पो. कॉ. प्रशांत पाटील व आकाश शिंपी आदींनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु केला.

मयत विठ्ठल पाटील यांच्या बारावीत शिकणा-या दुस-या मुलाने सुमारे दोन वर्षापुर्वी घरातच आत्महत्या केली होती. त्यानंतर घडलेल्या या घटनेत त्यांनी स्वत: आत्महत्या केली व तत्पुर्वी त्यांच्याच मुलाची हत्या झाली. अशा प्रकारे एकाच घरातील तिघांचा अनैसर्गीक मृत्यु झाला आहे. सैन्यात काम करत असतांना विठ्ठल पाटील यांना समोरच्या शत्रूसोबत दोन हात करतांना जेवढा त्रास झाला नसेल त्यापेक्षा अधिक त्रास आपल्याच मुलाकडून व्यक्तीगत जीवनात झाला. परक्यांसोबत दोन हात करणे सोपे असते मात्र स्वकियांसोबत लढणे कठीण असते हे विठ्ठल पाटील यांना वेळोवेळी जाणवले असेल. एखाद्याच्या नशिबी अपत्य सुख नसते. त्यातून वाढणा-या पारिवारिक अडचणी आणि दुख: कसे असते हे या घटनेतून पुढे आले आहे. अल्लड आणि कमी वयात अधिक पैसा हाती आला म्हणजे राग आणि व्यसन कसे जवळ येतात हे देखील या घटनेतून पुढे आले आहे. एका बापाची हतबलता त्याला कुविचाराकडे कसे घेऊन जाते हे देखील या घटनेच्या निमीत्ताने दिसून आले आहे. मुलामुळे अडचणीत आलेल्या बापाला जवळच्या नातेवाईकांनी शांत चित्ताने चांगला अथवा सनदशीर मार्ग दाखवला असता तर कदाचीत  व्यसनी मुलापासून बापाची सुटका झाली असती अथवा त्या दुखा:ची तिव्रता कमी झाली असती. या घटनेमुळे मयत विकीच्या  पाच महिन्याच्या बाळाचे पितृछत्र हरपले आहे. एका विस वर्षाच्या सौभाग्यवतीचे पतीरुपी काटेरी कुंपन उध्वस्त झाले. एका आईचा मुलगा देवाघरी गेल्याने तिच्या नशिबी अंधार पसरला. एकंदरीत हसत्या खेळत्या दोन परिवाराची केवळ मद्यपी विकीमुळे आबाळ झाली.         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here