पो.नि. अनिल बडगुजर यांची सतर्कता आली उपयोगी
जळगाव : एकतर्फी प्रेमातून झालेला वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला. तो वाद अंगाशी येण्याच्या भितीने तरुणाने पोलिस स्टेशन परिसरात विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. रामानंद नगर पोलिस स्टेशन परिसरात घडलेला हा प्रकार लक्षात येताच पो.नि. अनिल बडगुजर यांनी तात्काळ त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यामुळे तो बचावला. हा प्रकार पो.नि. अनिल बडगुजर यांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. त्या तरुणाची प्रकृती आता स्थिर आहे. आज दुपारी रामानंद नगर पोलिस स्टेशनला दुपारी हा प्रकार घडला.
यावल तालुक्यातील तरुण व तरुणी फैजपूर शहरातील महाविद्यालयात सोबत शिक्षण घेत होते. त्यामुळे ते एकमेकांच्या सहवासात आले. त्यांनी एकत्र फोटो देखील काढले होते. दरम्यान या तरुणीचे लग्न झाले. त्यामुळे ती पतीसह रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत राहते. आपली सहमैत्रीण लग्न होवून सासरी जळगावला आल्याचे समजल्यामुळे हा तरुण काहीसा नाराज अर्थात डिस्मुड झाला. त्याने निराशेच्या भरात तिच्या पतीसह दिराला फोन करत उलट्सुलट माहिती देण्याचे चुकीचे प्रकार सुरु केले. त्यामुळे वैतागलेल्या विवाहीत तरुणीने त्या तरुणासह त्याच्या दोघा मित्रांविरोधात रामानंद नगर पोलिस स्टेशनला तकार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीनुसार त्या तरुणाला चौकशीकामी बोलावण्यात आले. त्याला पो.नि. अनिल बडगुजर यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. त्याचवेळी त्या तरुणीला देखील बोलावण्यात आले. आता आपल्यावर गुन्हा दाखल होणार असे लक्षात आल्यामुळे त्या तरुणाची गाळण झाली. भितीपोटी त्याने पोलिस निरिक्षकांच्या दालनातून बाहेर येताच विषारी औषधाची बाटली काढून ते औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच पो.नि. अनिल बडगुजर यांनी त्याला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली गतीमान केल्या. त्यामुळे त्याचा जीव वाचला. आता त्याची प्र्कृती धोक्याबाहेर असून स्थिर आहे.
तरुणीने तक्रार दिल्यास त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा पो.नि. अनिल बडगुजर यांनी दिला आहे. तसेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरुद्ध वेगळा गुन्हा देखील दाखल केला जाईल असे पो.नि. अनिल बडगुजर यांनी म्हटले आहे.