जळगाव : जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गावरील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या सर्विस रोडच्या कामावरील तिघा मजुरांना चिरडून ठार केल्याप्रकरणी डंपर चालकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अतुल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरण पावलेल्या तिघा परप्रांतीय मजुरांपैकी एक मजूर बाल कामगार होता.
शैलेंद्रसिंग नथ्थुसिंग राजपुत, भुपेंदर मिश्रीलाल राजपुत (दोघे रा. दलेलपुर ता. जि. विटा (उत्तर प्रदेश) व बाल कामगार योगेश कुमार राज बहादुर (रा. सिडपुरा ता. कासगंज जि. पटीयाली – उत्तर प्रदेश) अशी मरण पावलेल्या तिघा मजुरांची नावे आहेत. अल्पवयीन मयत हा बाल कामगार असल्याचे माहित असूनही ठेकेदाराने त्यास कामावर ठेवण्याचा मुद्दा फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे हे करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासात भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, पो कॉ जावेद शहा, राहुल वानखेडे आदींनी तांत्रिक विश्लेषनासह गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेत आठ तासात गुन्ह्याचा छडा लावण्याकामी सहभाग घेतला. डंपर चालक प्रकाश कुमार सुदामा प्रसाद पटेल (रा. उफरवली, पोष्ट कर्दार, तहसील सिहाबाद जि. सिथी – मध्य प्रदेश) यास अटक करण्यात आली आहे.