ट्रक – रेल्वेच्या अपघातात लोहमार्ग वाहतूक पाच तास ठप्प

जळगाव : बोदवड ते मुक्ताईनगर दरम्यान आज सकाळी रेल्वे आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. गव्हाने भरलेला ट्रक रेल्वे गेट तोडून रेल्वे ट्रॅक वर गेला. त्याच वेळी भरधाव वेगात अमरावती एक्सप्रेस आल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही मात्र धावत्या रेल्वे इंजिनमधे अडकलेला ट्रक सुमारे 300 मीटर अंतरापर्यंत फरफटत गेला. या घटनेत रेल्वे इंजिनचे नुकसान झाले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर दोन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या. आज दिनांक 14 मार्च रोजी सकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. 

या अपघाताची माहिती समजताच लोहमार्ग पोलीस, बोदवड पोलीस स्टेशन आणि रेल्वे आपत्कालीन व्यवस्था घटनास्थळी दाखल झाली. रेल्वेच्या इंजिनखाली आलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि क्रेनचा वापर करण्यात आला. याशिवाय वीज पुरवठा काही वेळ खंडीत करण्यात आला. पर्यायने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. 

महाराष्ट्र एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, भुसावळ-बडनेरा आणि बडनेरा-नारखेडा पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. काही गाड्या वरणगाव आणि भुसावळ येथे थांबवण्यात आल्या. या मार्गावर ओव्हर ब्रिज सुरू होऊन जवळपास दीड वर्ष झाले आहे. त्यामुळे रस्ता वाहतूक फ्लाय ओव्हर ब्रिजने सुरू झाली आहे. तरी देखील ट्रक चालकाने कळत नकळत फ्लाय ओव्हरने जाण्याऐवजी जुन्या मार्गाचा वापर केला आणि अपघात घडला. फ्लाय ओव्हर ब्रिज सुरू झाला असताना जुना मार्ग बंद करणे गरजेचे होते असे म्हटले जात असून तशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here