बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्हा पोलिस वाहतुक शाखेच्या दोघा कर्मचा-यांवर पन्नास रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन कारवाई केली होती. एसीबीच्या या कारवाईची पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दखल घेतली. त्यांनी थेट जिल्हा वाहतुक शाखाच पुढील आदेशापर्यंत बरखास्त केली आहे.
बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी केलेल्या या कारवाईने बुलढाणा जिल्हा पोलिस दलात खळबळ माजली आहे. पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी आपला युनिफॉर्म परिधान करु नये असे या आदेशात म्हटले आहे. यासह जिल्ह्यातील चेक पोस्ट देखील बंद करण्यात आले आहेत. जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले असून जिल्ह्यातील इतर वाहतूक पोलिसांना आपापल्या पोलीस स्टेशनशी जोडण्यात आले आहे. लवकरच या शाखेचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.